डी. के. शिवकुमार यांच्या भेटीने चर्चेला उधाण
बेळगाव : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी माजी राज्यसभा सदस्य व भाजप नेते डॉ. प्रभाकर कोरे यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीनंतर आपण प्रभाकर कोरे यांना काँग्रेसमध्ये बोलावलो नाही, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तर या वयात पक्ष बदलण्याचा विचार नसल्याचे डॉ. प्रभाकर कोरे यांनी सांगितले आहे. या दोन्ही नेत्यांनी दुपारचे जेवण घेतले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना डी. के. शिवकुमार यांनी प्रभाकर कोरे हे आपले कायमचे मित्र आहेत. सरकार कोणाचेही असले तरी चांगल्या कामांना त्यांची संस्था नेहमी सहकार्य देते. गांधी भारत कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर पाहुण्यांना राहण्यासाठी केएलई संस्थेने 170 हून अधिक खोल्या उपलब्ध करून दिल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आवश्यक मदत त्यांच्याकडून मिळत आहे. त्यामुळेच आपण त्यांची भेट घेतली आहे. त्यांच्या निवासस्थानी भाकरीचे जेवणही घेतले आहे, असे शिवकुमार यांनी सांगितले.
डॉ. प्रभाकर कोरे यांच्या कुटुंबीयांचे स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान आहे. त्यांचे वडील स्वातंत्र्य चळवळीत होते. चळवळीसाठी त्यांनी अर्थसाहाय्यही केले आहे, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. डॉ. प्रभाकर कोरे यांना उत्तम स्थानमान मिळाले नाही, याकडे उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता भाजप नेत्यांनाच हा प्रश्न विचारा, असे त्यांनी सांगितले. मंगळवारी होणाऱ्या कार्यक्रमासाठी राहुल गांधी व प्रियांका गांधी सकाळी 10.30 वाजता येणार आहेत. विमानतळावरून थेट ते सुवर्णविधानसौधला येणार आहेत, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, डॉ. प्रभाकर कोरे यांनीही पत्रकारांशी बोलताना यासंबंधी खुलासा केला आहे. डी. के. शिवकुमार व आपली मैत्री आहे. ही एक सौजन्याची भेट होती, असे त्यांनी सांगितले. पक्ष बदल करणार का? या प्रश्नावर आपला तो विचार नाही. या वयात दुसरे लग्न करण्याची इच्छा नाही, असे सांगत त्यांनी या विषयाच्या चर्चेला पूर्णविराम दिला.









