उत्पन्नापेक्षा अधिक संपत्तीप्रकरणी सुनावणी टळली
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील मुख्यमंत्रिपदाचे दावेदार राहिलेले डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात सीबीआयकडून उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमविल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 14 जुलैपर्यंत लांबणीवर टाकली आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने शिवकुमार यांच्या विरोधात याप्रकरणी होत असलेल्या चौकशीला स्थगिती दिली होती. याच्या विरोधात सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अंतरिम आदेश रद्द करणे आणि काँग्रेस नेत्याची चौकशी करण्याची अनुमती देण्याची मागणी सीबीआयने याचिकेद्वारे केली आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 14 जुलैपर्यंत टाळली आहे.
23 मे रोजी हे प्रकरण उच्च न्यायालयासमोर येणार असल्याचे शिवकुमार यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून निदर्शनास आणून देण्यात आल्यावर न्यायाधीश बी.आर. गवई आणि संजय कौल यांच्या खंडपीठाने सुनावणी स्थगित केली. उच्च न्यायालयाने 10 फेब्रुवारी रोजी शिवकुमार यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणी सीबीआयच्या कार्यवाहीला स्थगिती दिली होती.
डी.के. शिवकुमार यांच्या विरोधात 19 गुन्हे नोंद आहेत. प्राप्तिकर विभागाने 2017 मध्ये शिवकुमार यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते, याच्या आधारावर ईडीने त्यांच्या विरोधात चौकशी सुरू केली होती. ईडीच्या तपासानंतर सीबीआयने शिवकुमार यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यासाठी राज्य सरकारकडून मंजुरी मागितली होती. राज्य सरकारकडून 25 सप्टेंबर 2019 रोजी मंजुरी मिळाली होती. तर 3 ऑक्टोबर 2020 रोजी शिवकुमार यांच्यावर सीबीआयने भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमाच्या अंतर्गत गुन्हा नोंदविला होता.








