वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अनुभवी आणि आपल्या वैयक्तिक बुद्धिबळ कारकीर्दीत अनेकवेळा विश्वविजेतेपद मिळवणाऱ्या ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदला 17 वर्षीय नवोदित ग्रँडमास्टर डी. गुकेशने जागतिक विश्व बुद्धिबळपटूंच्या मानांकनात मागे टाकण्याचा पराक्रम केला आहे.
ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंदने आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ क्षेत्रात सुमारे 37 वर्षे आपले वर्चस्व राखले होते. अझरबैजानमधील बाकू येथे सुरू असलेल्या फिडेच्या विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील डावात डी. गुकेशने मिस्ट्रेडिन इस्कॅनडोरोवचा पराभव केला. या विजयामुळे गुकेशने फिडेच्या विश्व मानांकन क्लासिक खुल्या विभागात नववे स्थान मिळवताना 2755.9 रेटींग गुण मिळवले. गुकेशने आनंदला नवव्या स्थानावरून खाली खेचले असून आता आनंद 2754 मानांकन गुणासह दहाव्या स्थानावर आहे. 1986 पासून आनंदने विश्व मानांकन बुद्धिबळपटूंच्या यादीत केवळ दोनवेळा आपले दुसरे स्थान गमवले होते. आनंदचे स्थान एका अंकाने घसरल्याने तो दुसऱ्या स्थानावर होता.
1 सप्टेंबर रोजी फिडेची पुढील अधिकृत मानांकन यादी जाहीर करण्यात येणार आहे. तत्पुर्वी अद्याप जवळपास एक महिन्याचा कालावधी बाकी असल्याने गुकेश मानांकन क्रमवारीतील आणखी वरचे स्थान मिळवू शकेल. 17 वर्षीय गुकेश हा आता जागतिक बुद्धिबळपटूंच्या मानांकन यादीत पहिल्या दहा खेळाडूमध्ये आहे. फिडेच्या मानांकनात पहिल्या 10 खेळाडूमध्ये स्थान मिळवणारा गुकेश हा तिसरा भारतीय बुद्धिबळपटू आहे









