37 वर्षांनी स्थान गमावण्याचा विश्वनाथन आनंदवर प्रसंग
वृत्तसंस्था/ चेन्नई
किशोरवयीन ग्रँडमास्टर डी. गुकेशने तीन दशकांहून अधिक काळ भारताचा अव्वल बुद्धिबळपटू राहिलेल्या महान विश्वनाथन आनंदची जागा घेतली आहे. आनंद जुलै, 1986 पासून भारताचा आघाडीचा बुद्धिबळपटू राहिलेला आहे. चेन्नईच्या या 17 वर्षीय ग्रँडमास्टरला नुकत्याच बाकू येथे झालेल्या फिडे विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मॅग्नस कार्लसनकडून पराभूत व्हावे लागले होते. गुकेश आता आनंदच्या पुढे जाऊन जागतिक क्रमवारीत आठव्या क्रमांकावर पोहोचला आहे.
गुकेशने प्रथमच ‘फिडे’च्या यादीतील पहिल्या 10 खेळाडूंमध्ये प्रवेश केला आहे. पाच वेळा विश्वविजेता राहिलेला आनंद सध्या नवव्या क्रमांकावर आहे. 1 सप्टेंबरपासून लागू झालेल्या ‘फिडे रेटिंग’नुसार, गुकेशचे रेटिंग 2758 आहे, तर आनंदचे रेटिंग 2754 आहे. गुकेशला 1 ऑगस्टपासून ‘रेटिंग’ यादीत तीन स्थानांची बढती मिळालेली आहे.
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कार्लसनकडून पराभूत होऊनही जगाला आपली दखल घ्यायला लावणारा आणखी एक किशोरवयीन खेळाडू आर. प्रज्ञानंद 2727 च्या रेटिंगसह 19 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तो गुकेश आणि आनंदच्या मागे भारताचा तिसऱ्या क्रमांकावरील खेळाडू बनला आहे.. सध्या आघडीच्या 30 खेळाडूंमध्ये पाच भारतीय आहेत आणि त्यात विदित संतोष गुजराथी (क्रमांक 27 वा) आणि अर्जुन एरिगाईसी (क्रमांक 29 वा) यांचा समावेश आहे. अनुभवी पी. हरिकृष्ण 31 व्या क्रमांकावर आहे.
बाकू येथे झालेल्या विश्वचषकादरम्यान गुकेशने ‘लाईव्ह वर्ल्ड रँकिंग्स’मध्ये आपला आदर्श आणि मार्गदर्शक आनंदला मागे टाकले होते. 1 जुलै, 1986 पासून भारतातील अव्वल क्रमांकावर राहिलेल्या आनंदने 37 वर्षांनंतर अव्वल स्थान सोडले आहे. गुकेशने अलीकडेच विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत अझरबैजानच्या मिसरतदीन इस्कंदारोव्हचा पराभव करून लाईव्ह रेटिंगमध्ये आनंदला मागे टाकले होते. आगामी आशियाई खेळांसाठीच्या भारतीय संघात निवडण्यात आलेले गुकेश आणि प्रज्ञानंद हे कोलकाता येथे पूर्वतयारी शिबिरात आणि त्यानंतर 5 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या टाटा स्टील चेस इंडिया स्पर्धेत भाग घेणार आहेत.









