देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे स्पष्टीकरण कोल्हापूर दौऱ्यावर असलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. तसेच, हसन मुश्रीफ यांच्यावर करण्यात आलेली इडीची कारवाई कुठपर्यंत आली आहे याची कोणतीच कल्पना आपल्याला नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून काहीही झाले तरी लोकसभेच्या 45 पेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असा खुलासाही त्यांनी केला.
पक्षाकडून लोकसभेसाठी घेण्यात येत असलेल्या विविध उपक्रम आणि जिल्हा भाजपमधील अंतर्गत नाराजी या पार्श्वभुमीवर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कोल्हापूर दौऱ्यवर आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले, “महाराष्ट्रात पक्षाकडून ‘लोकसभा प्रवास उपक्रम’ सुरू केला आहे. राज्यात लोकसभेच्या 45+ जागा जिंकण्यासाठी हा आमचा उपक्रम असून ‘संपर्क ते समर्थन’ असा आमचा प्रवास असणार आहे. जनता आम्हला समर्थन देत आहे याचं समाधान आहे. निवडणूक जवळ येईल तसे आम्हला आणखी समर्थन मिळेल आणि आमचाच विजय होईल. पण सोशल मीडियावर जाणीवपूर्वक भाजप विरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण चुकीच्या पद्धतीने तयार केलेलं ग्राफिक्स लोकांना समजत आहेत, त्यामुळं त्याची फारशी चिंता नाही. जनतेला खरं काय आणि खोटं काय आहे हे लोकांना कळतं आहे.”
पुढे बोलताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा बोलून दाखवताना, “प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतं की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा. भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना वाटतं की देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. पण आमच्या केंद्रीय समितीने जर सांगितले की पुढेही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील तर आम्हाला त्यासाठीच काम करावे लागेल.” असाही असेही ते म्हणाले.
इंडिया आघाडीवर टिका करताना प्रदेशाध्य बावनकुळे म्हणाले, “1 हजार लोकांना भेटल्यानंतर फक्त दोन ते तीन लोक इंडिया आघाडीला मत देणार असे म्हणत आहेत. शेकापचे जयंत पाटील यांच्यावर पक्ष शोधण्याची वेळ आली आहे. तर शरद पवार यांच्याकडे आता पक्ष राहिलेला नाही. येत्या काळात अजित पवार यांना आणखी समर्थन मिळणार असून जो पक्ष सांभाळेल त्यांच्यासोबतच नेते जातील. शरद पवार यांनी नरेंद्र मोदी यांना देखील बारामतीला बोलवले होते, पण त्याचा पवार यांना फारसा उपयोग झाला नाही. आता देखील राहुल गांधी यांना बारामतीला आणले तरी फारसा उपयोग होणार नाही. त्याच प्रमाणे उद्धव ठाकरे यांनी काही दिले नाही, पण एकनाथ शिंदे देत आहेत त्यामुळे शिवसेना नेते त्यांच्याबरोबरच राहतील.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी, “भाजप हा तीन पक्षांमध्ये बॉस नाही तर ज्येष्ठ म्हणून काम करेल. हसन मुश्रीफ यांची कारवाई कुठपर्यंत आलीय मला माहिती नाही. पण मला वाटतं त्यांच्या वरची कारवाई मागे घेतलेली नाही. आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतला तर केंद्र आणि राज्य सरकारला कळवले जाईल. महाराष्ट्राला अडचण निर्माण होईल अशी उंची धरणाची वाढवू नये.” असेही ते म्हणाले.








