वृत्तसंस्था/ मेक्सिको
झेक प्रजासत्ताकच्या टॉमस मॅकहेकने एटीपी टूरवरील येथे झालेल्या मेक्सिकन खुल्या पुरुषांच्या टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना स्पेनच्या फोकिनाचा पराभव केला.
या स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात मॅकहेकने अॅलेजेंड्रो फोकिनाचा 7-6 (8-6), 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत जेतेपद पटकाविले. एटीपी टूरवरील स्पर्धेतील मॅकहेकचे हे पहिले जेतेपद आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मॅकहेकने मिश्र दुहेरीचे सुवर्णपदक पटकाविले होते. एटीपी टूरवरील 500 दर्जाच्या स्पर्धेचे जेतेपद मिळविणारा मॅकहेक हा झेकचा तिसरा टेनिसपटू आहे. यापूर्वी झेकच्या टॉमस बर्डीच आणि रॅडेक स्टेपनिक यांनी असा पराक्रम केला होता. एटीपीच्या क्रमवारीत मॅकहेक सध्या 25 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी झालेल्या जिनिव्हा टेनिस स्पर्धेत मॅकहेकने सर्बियाच्या माजी टॉप सिडेड जोकोविचचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता.









