वृत्तसंस्था/ सिडनी
पहिल्या युनायटेड चषक सांघिक आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या लढतीत झेक प्रजासत्ताकने जर्मनीवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. झेक प्रजासत्ताकच्या टेनिसपटूंनी सलामीचे दोन्ही एकेरी सामने जिंकले आहेत.
या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या 21 वषीय लिहेकाने जर्मनीच्या 12 व्या मानांकित ऍलेक्सझांडेर व्हेरेव्हला 6-4, 6-2 अशा सेट्समध्ये पराभवाचा धक्का दिला. क गटातील या सामन्यात लेहिकाने चारवेळा व्हेरेव्हची सर्व्हिस भेदली. त्याचप्रमाणे दुसऱया एकेरी सामन्यात झेक प्रजासत्ताकच्या मारी बोझकोव्हाने जर्मनीच्या ज्युली निमेरवर 6-2, 7-5 अशा सेट्समध्ये मात करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. आता या लढतीत रविवारी झेकची क्विटोव्हा आणि जर्मनीची सिगमंड यांच्यात लढत होईल.
या स्पर्धेतील अन्य एका लढतीत ब्राझीलने नॉर्वेवर 2-0 अशी आघाडी मिळविली आहे. या लढतीतील पहिल्या एकेरी सामन्यात ब्राझीलच्या 15 व्या मानांकित ब्रिट्रेझ माईयाने नॉर्वेच्या हेल्गोचा 6-4, 6-2 असा पराभव केला. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात ब्राझीलच्या फिलीपी अल्वेझने नॉर्वेच्या डय़ुरासोव्हिकचा 6-3, 6-3 असा पराभव करत आपल्या संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनतर्फे पहिल्यादाच आयोजित केलेल्या या आंतरराष्ट्रीय मिश्र सांघिक टेनिस स्पर्धेत एकूण 18 देशांचे टेनिसपटू सहभागी झाले असून स्पर्धेतील सामने ब्रिस्बेन, पर्थ आणि सिडनी येथे खेळविले जात आहेत. शुक्रवारच्या सामन्यानंतर अ गटात ग्रीसने आघाडीचे स्थान मिळविले असून ब गटात स्वीत्झर्लंड पहिल्या स्थानावर आहे.









