मध्यप्रदेशात काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ : जुनी पेन्शन योजना लागू करणार
► वृत्तसंस्था / जबलपूर
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका वड्रा यांनी सोमवारी मध्यप्रदेशच्या जबलपूर येथील सभेद्वारे राज्यातील काँग्रेसच्या प्रचारमोहिमेला सुरुवात केली आहे. राज्यात सत्तेवर आल्यास जुनी पेन्शन योजना लागू केली जाणार आहे, तसेच प्रत्येक कुटुंबाला 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर पुरविण्यात येईल असे आश्वासन प्रियांका यांनी यावेळी दिले आहे.
काँग्रेस सत्तेवर आल्यास राज्यातील महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये नारी सन्मान निधीच्या स्वरुपात देण्यात येतील. तसेच कमलनाथ सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची योजना सुरू करण्यात आली होती, ती पूर्ण करण्यात येईल ही माझी गॅरंटी आहे. कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशात दिलेल्या गॅरंटी देखील आम्ही पूर्ण केल्याचा दावा प्रियांका यांनी केला. कर्नाटक तसेच हिमाचल प्रदेशात पक्ष सत्तेवर आल्यावर 500 रुपयांमध्ये गॅस सिलिंडर देण्याच्या आश्वासनाच्या पूर्ततेचा कुठलाच उल्लेख काँग्रेस नेत्यांकडून करण्यात आलेला नाही हे विशेष.
वीज बिल माफ करणार
मध्यप्रदेशात 100 युनिट वीज दर महिन्याला मोफत स्वरुपात उपलब्ध केले जाणार आहे. तर 20 युनिटपर्यंतच्या विजेचे बिल निम्म्यावर आणले जाईल असे आश्वासन प्रियांकांनी दिले आहे. मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारकडून भ्रष्टाचार केला जात असून राज्यात 225 पेक्षा अधिक घोटाळे झाले आहेत. सर्वच क्षेत्रांमध्ये घोटाळे झाले आहेत. शेतकऱ्यांच्या भरपाई वितरणातही भाजप सरकारने घोटाळा केल्याचा आरोप प्रियांका वड्रा यांनी केला आहे.
3 वर्षांत केवळ 21 जणांना रोजगार
मध्यप्रदेशात भाजपच्या तीन वर्षांच्या शासनकाळात केवळ 21 जणांनाच रोजगार मिळाला आहे, माझ्या कार्यालयाकडून यासंबंधी पुन्हा पडताळणी करण्यात आल्यास हा आकडा खरा असल्याचे स्पष्ट झाले. जनतेसमोर मांडला जाणारा आकडा खरा असावा असे माझे मानणे आहे. भाजपचे नेते सत्तेसाठी काहीही करू शकतात. मध्यप्रदेशात धनादेशाद्वारे जनादेशाची पायमल्ली करण्यात आली. मध्यप्रदेशात आमचे काही नेते सत्तेसाठी अन्य पक्षात गेले आणि स्वत:ची विचारसरणीही त्यांनी बदलली. भाजप नेते केवळ घोषणा करतात, त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नाहीत. भाजप केवळ डबल इंजिन अन् ट्रिपल इंजिनबद्दल बोलण्याचे काम करतो. हिमाचल आणि कर्नाटकमध्येही भाजपनेच हेच केले, परंतु तेथील जनतेने डबल इंजिनबद्दल बोलणे सोडा आणि काम करा अन्यथा सत्तेवरून हाकलू असा संदेश दिला असल्याचे उद्गार प्रियांका वड्रा यांनी काढले आहेत.
नर्मदा तटावर पूजा
तत्पूर्वी प्रियांका वड्रा यांनी नर्मदेच्या तटावर पूजा केली. प्रियांका यांच्या उपस्थितीत नर्मदेच्या तटावर आरतीही पार पडली आहे. प्रियांका वड्रा या सोमवारी डुमना विमानतळावर पोहोचल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत पेले. मध्यप्रदेशात चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे.









