ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Cylinder blast at Amravati District Women’s Hospital अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटाच्या धुरामुळे या वॉर्डमधील 8 नवजात बालकांना इजा पोहचली. त्यामधील दोन बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात तर इतरांना दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आयसीयू वॉर्डमध्ये अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटामुळे संपूर्ण वॉर्डमध्ये धुराचे लोट पसरले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. या वॉर्डमध्ये 35 नवजात बालकं होती. धुरामुळे आठ बालकांना किरकोळ इजा पोहचली. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. तातडीने रुग्णवाहिका बोलावून वॉर्डातील दोन जखमी बालकांना डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तर इतरांना दुसऱ्या वॉर्डमध्ये स्थलांतरित करण्यात आले.
अधिक वाचा : दसरा मेळाव्याबाबत राज ठाकरेंनी दिला होता योग्य सल्ला, पण मुख्यमंत्र्यांनी केलं दुर्लक्ष
दरम्यान, अमरावती दौऱयावर असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी डफरीन रुग्णालयात भेट देऊन नवजात बालकांच्या कुटुंबाची आस्थेने विचारपूस केली आणि प्रशासनाला आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.