आंध्र, ओडिशा, छत्तीसगढ अलर्ट मोडवर: महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव वाढला, नौका किनारी
प्रतिनिधी/ पुणे
दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण आलेल्या ‘मोन्था’ या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असून मंगळवारी रात्री ते आंध्र किनारपट्टीवरील मछलीपट्टनम ते कलिंगापटनम दरम्यान किनारपट्टीला धडकण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या वादळामुळे आंध्र, ओडिशा तसेच छत्तीसगड राज्याला रेड अलर्ट देण्यात आला असून लष्करासह सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील न्यून दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील वादळामुळे राज्यात अवकाळी पावसाची तीव्रता वाढली असून बहुतांश भागात दुपारनंतर वादळी पाऊस सुरू असून पुढील दोन दिवस तो कायम राहणार आहे. बंगालच्या उपसागरात ’मोन्था’ वादळ दक्षिण पश्चिम भागात ताशी 7 किमी वेगाने किनारपट्टीकडे सरकत आहे. हे वादळ उत्तर पश्चिमेकडे प्रवास करत असून, मंगळवारी सकाळी त्याची तीव्रता आणखी वाढणार आहे. मंगळवारी रात्री ते आंध्र किनारपट्टीला धडकण्याचा अंदाज आहे.
यावेळी वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमीपर्यंत पोहचणार आहे. यामुळे आंध्र, तामिळनाडू तसेच छत्तीसगढ राज्यात मंगळवार तसेच बुधवारी अती मुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. गेले दोन दिवस समुद्र खवळलेला असल्याने आधीपासून मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे. किनारपट्टीला धडकल्यानंतर वादळाची तीव्रता कमी होणार असून ते छत्तीसगढ कडे प्रवास करणार आहे. बुधवार नंतर याचा प्रभाव कमी होणार आहे.
दरम्यान, अरबी समुद्रांतील न्यून दाबाचे क्षेत्र आता वळसा घालून उत्तर पूर्वेकडे भारतीय किनारपट्टी कडे सरकत आहे. याच्या प्रभावामुळे आता अरबी समुद्र देखील खवळलेला असून गुजरात किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले आहे. पुढील काही दिवस या भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे.
राज्यात पाऊस : विदर्भात अलर्ट
या दोन्ही क्षेत्रांच्या प्रभावामुळे राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव वाढला असून 30 ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. समुद्र खवळलेला असल्याने सर्व नौका किनारपट्टीवर आल्या आहेत. पूर्ण पश्चिम किनारपट्टी तसेच तळ कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टीवर पावसाचा मारा पुढील तीन दिवस अधिक राहणार आहे. राज्याच्या दक्षिणेकडील भागात दुपारनंतर पावसाचे प्रमाण वाढणार आहे. विदर्भातील काही जिह्यात बुधवारी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा अडचणीत सापडला आहे. यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर जिह्यात पावसाची तीव्रता अधिक असेल. दरम्यान, बहुतांश भागात अवकाळीचा पाऊस सुरूच आहे. पुणे, मुंबईसह अनेक जिह्यात दुपारनंतर पाऊस होत आहे. राज्याच्या दक्षिण भागात याचा प्रभाव अधिक आहे.








