चौघांचा मृत्यू, 400 हून अधिक झाडे उन्मळून पडली ः घरांचीही पडझड
चेन्नाई / वृत्तसंस्था
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले मॅन्दोस चक्रीवादळ शनिवारी पहाटे चेन्नाई आणि महाबलीपुरम जवळच्या किनारपट्टीला धडकले. हे वादळ किनारपट्टीला धडकण्याच्या वेळेस ताशी 70 ते 85 किमी वेगाने वारे वाहत होते. मॅन्दोस चक्रीवादळाने किनारपट्टी भागात तांडव घातले असून तामिळनाडूमध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. तसेच वादळ-पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून घरांचीही पडझड झाली आहे. तसेच या तडाख्यात 98 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाल्याचीही नोंद झाली आहे. नुकसानीचे मूल्यांकन केले जात असून गरज भासल्यास केंद्र सरकारची मदत घेतली जाऊ शकते, असे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी सांगितले.
मॅन्दोस चक्रीवादळामुळे तामिळनाडू, पाँडिचेरी तसेच दक्षिण आंध्र किनारपट्टीच्या भागात मुसळधार पाऊस झाला आहे. तसेच प्रशासनही गतीने कामाला लागले आहे. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूसह तीन राज्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला. शाळांना सुट्टी देण्यात आली आहे, तसेच मासेमारी करणाऱयांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चक्रीवादळामुळे विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर खराब झाले असून 600 ठिकाणची वीज खंडित झाली आहे. चक्रीवादळामुळे चेन्नाईमध्ये 115 मिमी पाऊस झाला आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी या नैसर्गिक आपत्तीनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागांवर आमचे लक्ष आहे. नुकसानीचे मूल्यमापन केले जात असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.
चक्रीवादळाचा वेग आता मंदावला असला तरी मासेमारी करणाऱयांना समुद्रात जाण्यास मनाई करण्यात आली आहे. चेन्नाईमध्ये राष्ट्रीय आपत्ती दलाच्या विशेष पथकाला सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनने सर्व गार्डन्स आणि खेळाची मैदाने बंद करण्याचा आदेश दिला. तसेच तामिळनाडू सरकारने पाच हजारपेक्षा जास्त मदत केंदे सुरु करून स्थलांतरित लोकांची सोय केली आहे. या छावण्यांमध्ये किनारपट्टी भागातील लोकांना ठेवण्यात आले आहे. शिबिरात राहणाऱया लोकांना अन्न, पिण्याचे पाणी, आरोग्य यासह सर्व मूलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम, विलाप्पुरम, कुड्डालोर, रानीपेट, वेल्लोर, तिरुवल्लूरसह तामिळनाडूच्या 17 जिह्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालयांना शनिवारीही सुट्टी देण्यात आली होती. तसेच सोमवारची स्थिती रविवारी सायंकाळी जाहीर करण्यात येणार आहे.
आंध्रप्रदेशमध्ये आढावा बैठक
आंध्रप्रदेशच्या समुद्र किनाऱयावर झालेल्या पावसामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झालेय. अनेक भागात पूराची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावत आढावा घेतला. या बैठकीत चक्रीवादळाच्या स्थितीची आणि तयारीचा आढावा घेण्यात आला. एसपीएसआर नेल्लोर, तिरुपती, चित्तूर आणि अन्नामय्या या जिह्यातील प्रशासकीय अधिकाऱयांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 5 नोव्हेंबरच्या आसपास अंदमानच्या समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे मॅन्दोस या वादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ शुक्रवारी किनारपट्टीच्या दिशेने प्रवास करीत होते. शुक्रवारी सकाळी या वादळाचे तीव्र वादळात रुपांतर झाले.









