ओडिशा-पश्चिम बंगालवर परिणाम, बांगलादेशच्या दिशेने सरकण्याची चिन्हे : किनारपट्टी भागातील लोकांना केले सतर्क
वृत्तसंस्था/ कोलकाता
अरबी समुद्रात धडकलेल्या ‘तेज’ चक्रीवादळानंतर आता बंगालच्या उपसागरात नवीन चक्रीवादळ तयार होत आहे. बंगालच्या उपसागरावर खोल दाबाचे क्षेत्र तयार होत असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) एका बुलेटिनमध्ये दिला आहे. या चक्रीवादळाला ‘हामून’ असे नाव देण्यात आले आहे. इराणने हे नाव दिले आहे. रविवारी रात्री उत्तर-पूर्वेकडे सरकल्यानंतर ही प्रणाली सध्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर स्थित आहे. पश्चिम बंगाल आणि ओडिशा या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता असून किनारपट्टीवरील लोकांना सतर्क करण्यात आले आहे.
‘हामून’ हे चक्रीवादळ ओडिशातील पारादीपच्या दक्षिण-नैर्त्रुत्येस सुमारे 400 किमी आणि पश्चिम बंगालमधील दिघाच्या दक्षिण-नैर्त्रुत्येस 550 किमी मध्यभागी आहे. चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेता किनारी भागातील लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पुढील 12 तासात कमी दाबाचे क्षेत्र चक्रीवादळात बदलण्याची शक्मयता आहे. त्यानंतर ते हळूहळू उत्तर आणि ईशान्येकडे सरकेल. ‘हामून’ चक्रीवादळ 25 ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या सुमारास खेपुपारा आणि चितगाव दरम्यान बांगलादेशचा किनारा ओलांडण्याची शक्मयता आहे. दरम्यान, ओडिशा सरकारने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. अतिवृष्टी झाल्यास सखल भागातील लोकांना बाहेर काढण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
‘हामून’ चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 200 किमी समुद्रात सरकणार असल्याचे हवामानशास्त्रज्ञ यु. एस. दास यांनी सांगितले. वादळाच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसांत किनारी ओडिशात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्मयता आहे. केओंझार, मयूरभंज आणि ढेंकनाल व्यतिरिक्त उत्तर आणि दक्षिण किनारपट्टी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडेल, असे हवामान खात्याने सांगितले. तसेच मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन विकास विभागाने मच्छिमारांना खोल समुद्रात जाऊ नये असा सल्ला दिला आहे. पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर, कोलकाता आणि दक्षिण 24 परगणा जिल्ह्यांच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि मध्यम पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे.









