ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुढील सहा तासात बिपरजॉय चक्रीवादळ अधिक तीव्र होणार असून, त्याचा परिणाम महाराष्ट्रासह गुजरातच्या किनारपट्टीवर दिसून येणार आहे.
भारतीय हवामान विभागाने रविवारी दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, बिपरजॉय चक्रीवादळ पूर्वमध्य अरबी समुद्रावर रविवारी (दि. 11) मध्यरात्री 2.30 वाजता पोरबंदरच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 510 किलोमीटर अंतरावर होते. पुढील सहा तासांमध्ये हे चक्रीवादळ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या वादळामुळे बंगालचा उपसागर ते म्यानमार किनारपट्टीपर्यंत असलेल्या कमी दाबाच्या पट्टय़ांची तीव्रता कमी होण्याची शक्मता आहे. ही स्थिती मान्सूनसाठी अनुकूल आहे. या अनुकूल स्थितीमुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांची आगेकूच सुरू राहिल. मान्सूनसाठी निर्माण झालेल्या पोषक स्थितीमुळे मान्सून पुढील दोन दिवसांत गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकणार आहे.
दरम्यान, हे चक्रीवादळ महाराष्ट्र किंवा गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता नाही. बिपरजॉय चक्रीवादळ पूर्व-मध्य अरबी समुद्रातून हळूहळू उत्तर आणि वायव्येकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गोवा, गुजरातसह कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.









