प्रतिनिधी/ वास्को
वास्कोतील आल्त दाबोळी भागातील मुख्य नाक्यावर ट्रकखाली सापडून सायकलस्वार ठार झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास घडली. मयत सायकलस्वार युवकाची ओळख पटलेली असून त्याचे नाव खर्कप्रसाद भरडू जैशी(45) आहे. मयत महाराष्ट्रातील आहे. वास्कोत मागच्या आठ दिवसातील हा दुसरा जीवघेणा अपघात आहे.
वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आल्त दाबोळीच्या मुख्य नाक्यावरील सिग्नलवरच हा अपघात घडला. सायकलस्वाराला काँक्रिट मिक्सर ट्रकचा धक्का लागल्याने तो रस्त्यावर कोसळला व ट्रकच्या चाकाखाली सापडला. या अपघातात तो जागीच ठार झाला. वास्को पोलिसांनी या अपघाताचा पंचनामा केलेला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार या नाक्यावर लाल सिग्नेल पडलेले असताना सदर ट्रक व सायकलस्वार थांबलेले होते. मात्र हिरवे सिग्नल पडताच मयत सायकलस्वार प्रथम जाण्याच्या प्रयत्नात अचानक ट्रकच्या समोर आला. त्यामुळे त्याला ट्रकचा धक्का बसला व तो ट्रकखाली चिरडला गेला.
रविवारी रात्री साडे दहाच्या सुमारास मालवाहू ट्रकने ठोकरल्याने वरूणापुरी नाक्यावर नौदल कर्मचारी ठार झाला होता. आठ दिवसांच्या आत वरूणापुरीपासून साधारण दीड किलो मिटर अंतरावर असलेल्या दाबोळीच्या नाक्यावर दुसरा जीवघेणा अपघात घडला. वास्कोतील या महामार्गावर जीवघेणे अपघात घडत असल्याने लोकांमध्ये असुरक्षीतता पसरलेली आहे.









