दोन लाखाहून अधिक रक्कम उकळली : सीईएन पोलिसात फिर्याद दाखल
बेळगाव : बेळगाव येथील एका व्यावसायिकाचा फोटो एडिट करून सायबर गुन्हेगारांनी त्याला 2 लाख 6 हजार रुपयांना गंडवले आहे. अश्लील फोटो तुमच्या संपर्कातील लोकांना पाठविण्याची धमकी देत रक्कम उकळण्यात आली असून यासंबंधी सीईएन पोलीस स्थानकात एफआयआर दाखल झाला आहे. जाधवनगर येथील 32 वर्षीय व्यावसायिकाने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा-2000 कलम 67, 66(डी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सीईएन पोलिसांनी तपास हाती घेतला असून व्यावसायिकाला ठकवणाऱ्या सायबर गुन्हेगारांचा शोध घेण्यात येत आहे.
उपलब्ध माहितीनुसार 21 फेब्रुवारी 2025 रोजी आपले सिबिल स्कोअर चेक करण्यासाठी प्लेझंट पॅरा लोन अॅपमध्ये जाऊन त्यांनी तपासणी केली. सिबिल स्कोअर सर्च करताना त्यांना स्कोअर दाखविण्याऐवजी एक लोन पेज उघडले. साडेतीन हजार रुपये कर्ज लगेच देऊ, असा मजकूर त्यांच्या मोबाईलवर आला. त्यांनी आपल्याला कर्जाची गरज नाही, असे सांगत त्या अॅपमधून बाहेर पडले.
केवळ तासाभरात त्यांच्या बँक खात्यात साडेतीन हजार रुपये जमा झाले. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन येऊ लागले. त्यांचे फोटो एडिट करून ते अश्लील बनविण्यात आले होते. तुमच्या संपर्कातील व्यक्तींना पाठवतो, अशी धमकी देत सायबर गुन्हेगारांनी पैशांची मागणी केली. 22 फेब्रुवारीपासून 18 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने त्यांनी 2 लाख 6 हजार रुपये गुन्हेगारांच्या बँक खात्यात जमा करूनही त्यांच्या संपर्कातील काही जणांना अश्लील फोटो पाठवून इतरांकडूनही पैशांची मागणी केली आहे. त्यामुळे या व्यावसायिकाने सीईएन पोलीस स्थानकात धाव घेतली असून पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर पुढील तपास करीत आहेत.









