कोल्हापूर / आशिष आडिवरेकर :
नागरिकांचा डिजीटल पेमेंटकडे कल वाढल्याचे पाहून चोरटेही सध्या हायटेक झाले आहेत. गेल्या वर्षभरात कोल्हापुरातील 5 हजार 365 नागरिकांची 56 कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. कोल्हापूर पोलिसांनी तातडीने पावले उचल्यामुळे यापैकी जवळपास 6 कोटी रुपयांची रक्कम फ्रिझ करुन ठेवण्यात यश आले आहे. तर फसवणूकीपैकी 45 लाख रुपयांची रक्कम परत देण्यात आली आहे. यामुळे फसवणूक झालेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा देण्यात कोल्हापूर पोलीस यशस्वी ठरले आहेत.
कोल्हापूर जिह्यात आर्थिक सुबत्ता चांगली असल्याने सर्वाधिक क्रेडिट, डेबिट कार्डचा वापर होतो. त्याचबरोबर डिजीटल पेमेंट करण्याकडेही नागरिकांचा मोठा कल आहे. त्याचाच गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत, गेल्या काही महिन्यांतील क्राईम रेट पाहता सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून, कोल्हापुरात ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. यासाठी केंद्र सरकारच्या वतीने सुरु केलेल्या एनसीसीआरपी पोर्टल किंवा 1930 या टोल फ्री नंबरवर तत्काळ (गोल्डन हावर) तक्रार नोंदविल्यास आपले गेलेले पैसे परत मिळण्याची शक्यता निर्माण होते. तक्रारीची तत्काळ दखल घेऊन कोणत्या खात्यातून पैसे गेले आहेत. ते कोणत्या खात्यात जमा झाले आहेत. हे शोधणे सोपे पडते. यामुळे पुढे होणारे व्यवहार थांबविणे शक्य होते. यामुळे फसवणुकीची रक्कम पुढे जाण्यापासून रोखण्यात यश येते.
- 45 लाख परत, 6 कोटी फ्रीझ
कोल्हापूर पोलिसांच्या सायबर विभागाने गेल्या वर्षभरात फसवणुकीची 45 लाख रुपयांची रक्कम मूळ मालकांना परत केले आहेत. तर 6 कोटी रुपयांची रक्कम विविध खात्यांवर फ्रिझ करुन ठेवली आहे. सध्या या रक्कमेबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु असून लवकरच ही रक्कम नागरिकांना परत करण्यात येणार आहे.
- एनसीसीआरपी पोर्टल म्हणजे काय ?
केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने 2019 मध्ये एनसीसीआरपी पोर्टल सुरु केले आहे. ऑनलाईन फसवणूक झालेला व्यक्ती मोबाईल किंवा नेटकॅफेमधून या पोर्टलवरती आपली तक्रार नोंदवू शकतो. या पोर्टलवर महिला किंवा लहान मुले तसेच ऑनलाईन आर्थिक फसवणूक किंवा हनी ट्रॅप संदर्भात अशा सर्व प्रकारच्या सायबर संबंधित गुन्हे दाखल करण्यात येतात. देशभरातील उच्चपद्स्थ अधिकारी, सायबर तज्ञ, बँकेचे अधिकारी, वकील यांचा या पोर्टलमध्ये समावेश आहे.
- तक्रार कशी करावी
फसवणूक झाल्यावर नेटकॅफेमधून किंवा मोबाईलद्वारे या पोर्टलवर लॉगिन करुन आपले अकौंट ओपन करावे
यानंतर फसवणूक किंवा तक्रारीची वर्गवारी निवडावी,
किती रुपयांची फसवणूक, कोणत्या प्रकारे फसवणूक झाली हे नोंद करावे
फसवणुकीसंदर्भात असणारे स्क्रिनशॉट, बँकेतील मॅसेज, ट्रॅन्झॅक्शन आयडी, रेफरन्स नंबर याचा तपशील द्यावा
संशयिताचा मोबाईल नंबर, फोटो किंवा युपीआयआयडी असेल तर द्यावा
यानंतर सायबर विभागाकडून याच्यावर तत्काळ कारवाई सुरु होते.
कोल्हापूर जिह्यात ऑनलाईन फसवणुकीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. मात्र अशाप्रकारे ऑनलाईन फसवणूक झाल्यास नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. फसवणूक झाल्यानंतर तत्काळ तक्रार दाखल केल्यास फसवणूकीची रक्कम परत मिळवली जाऊ शकते. मात्र नागरिकांनी यासाठी तत्काळ एनसीसीआरपी पोर्टल किंवा 1930 या टोलफ्री नंबरवर संपर्क साधून आपली तक्रार नोंदविणे आवश्यक आहे. याचसोबत कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने 8412841100 हा नंबरही सुरु केला आहे.
महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक








