तिघांच्या बँक खात्यातून रक्कम लांबविली : कोवाड पोलिसात गुन्हा नोंद
वार्ताहर /उचगाव
शिनोळी (ता. चंदगड) येथील एक्वा कंपनीमध्ये काम करत असलेल्या निट्टूर गावातील तीन कर्मचाऱ्यांची दि. 21 मे रोजी बँक खात्यातील सायबर गुन्हेगारांनी मोबाईल नंबर हॅक करून सुमारे 6 लाख 3 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. सदर घटना 20 ते 22 मे दरम्यान घडली असून कोवाड पोलीस स्थानकात ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. विश्वनाथ पाटील तीन लाख रुपये, पांडुरंग महादेव पाटील दोन लाख रुपये आणि दीपक कृष्णा पाटील एक लाख तीन हजार रुपये (सर्व रा. निटूर) अशी फसवणूक झालेल्यांची नावे आहेत. त्यांचे खाते बँक ऑफ महाराष्ट्र, कोवाड शाखा येथे असून याच शाखेतून ही रक्कम चोरांनी उचलली आहे. सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअप ग्रुपवर एक लिंक पाठवली. पांडुरंग महादेव पाटील यांनी ती लिंक ओपन करताच हॅकर्सनी त्यांचे व्हॉट्सअप हॅक केले. त्यानंतर त्यांच्या व्हॉट्सअप नंबरचा पूर्ण ताबा मिळवला व त्यांच्या हॅक झालेल्या नंबरवरून गावातील ग्रुपवर तीच लिंक शेअर केली. मित्राने पाठवलेली लिंक ग्रुपवर आली आहे असे समजून दीपक आणि विश्वनाथ यांनी ती ओपन केली. पण त्यामागे हॅकर्सचा हात होता.त्यानंतर या सर्वांच्या खात्यातून रक्कम काढली. याची तक्रार कोवाड पोलीस स्टेशन (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे ऑनलाईन नोंदविण्यात आली. पोलिसांनी चौकशी सुरू केली असून हे प्रकरण सायबर गुन्हे विभागाकडे वर्ग करण्यात येणार आहे.









