रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रत्नागिरी : ‘वर्क फ्रॉम होम’ची नोकरी देण्याचे आमिष दाखवून एका महिलेची सुमारे 10 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार रत्नागिरी शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर भामट्यांविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सायबर गुन्ह्यांबाबत पोलिसांकडून वारंवार जनजागृती केली जात आहे, तरीही या गुन्हेगारांचे नागरिक आजही शिकार होताना दिसत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरानजीकच्या कुवारबाव येथील वृंदावन सोसायटीमध्ये राहणाऱ्या रोहिणी मंदार गीते (45) यांनी या बाबतची तक्रार शहर पोलिसांकडे दिली. गीते यांची 8 ते 27 मे 2025 या कालावधीत ही फसवणूक झाली. अज्ञात आरोपींनी इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपवर ‘स्केचर्स’ कंपनीत ‘वर्क फ्रॉम होम’च्या कामाची जाहिरात दिली होती.
या जाहिरातीला प्रतिसाद दिल्यानंतर आरोपींनी रोहिणी गीते यांच्याशी टेलिग्राम अकाऊंटवरून संपर्क साधला. सुरुवातीला आरोपींनी काही कस्टम ऑर्डरसाठी गीते यांच्याकडून पैसे भरून घेतले आणि त्या बदल्यात त्यांना योग्य परतावा दिला. यामुळे विश्वास बसल्यानंतर गीते यांनी बँक ऑफ इंडिया आणि डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या खात्यांमधून एकूण 9 लाख 96 हजार 991 रुपये आरोपींच्या खात्यात जमा केले. मात्र, यानंतर आरोपींनी गीते यांना कोणताही परतावा दिला नाही.
तसेच गुंतवलेली रक्कमही परत केली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गीते यांच्या पायाखालची जणू वाळूच सरकली. त्यांनी पोलिसात धाव घेत त्या विषयी तक्रार दिली. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात 6 जून रोजी गुन्हा (गु.र.नं. 241/2025) दाखल करण्यात आला.
भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023च्या कलम 318(4), 3(5) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (ड) नुसार एका महिला आरोपीसह प्रवीण नावाच्या व्यक्तीवर आणि इतर अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास रत्नागिरी पोलीस करत आहेत.








