प्रतिनिधी / नंदगड : येथील बाजारपेठेतील सायबर कॅफेला पहाटे चार वाजता शॉर्टसर्किटने आग लागल्याने सायबर कॅफे जळुन खाक झाला आहे . नंदगड बाजारपेठेतील बसवराज कापसे यांच्या घरी माणिक कुरीया यांचा सायबर कॅफेचा व्यवसाय होता. पहाटे चार वाजता शॉर्टसर्किटने ही आग लागली. फोटो स्टुडिओ व सायबर कॅफे संपूर्ण आगीच्या भक्षस्थानी पडला. यात चार संगणक संच, 4 फोटो कॅमेरे ,व्हिडिओ कॅमेरे यासह इतर फोटोग्राफी व सायबर कॅफेला लागणारे साहित्य व फर्निचर जळून खाक झाले आहे. या आगीत अंदाजे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.
शेजारी राहणारे गजानन चव्हाण हे पहाटे चार वाजता उठले होते. लक्षात येताच गजानन चव्हाण व विश्वजीत चव्हाण यांनी धाडसाने पत्रे फोडून वरून पाण्याचा टाकून आग आटोक्यात आणली. चव्हाण कुटुबीयांनी दाखवलेल्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळलेला आहे. या ठिकाणी अग्निशामक दल पहाटे साडेपाच वाजता आल्यानंतर आग पूर्णपणे आटोक्यात आली. तलाठी व महसूल अधिकाऱ्याने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.