महापालिकेची कारवाई : लेआऊट मालकाला आयुक्तांना भेटण्याची सूचना : नाल्यावरून रस्ता करण्यासाठी झाडांची कत्तल
बेळगाव : बाडीवाले कॉलनी-टीचर्स कॉलनी खासबाग येथे सुरू असलेल्या नवीन खासगी लेआऊटसाठी नाल्यावरून रस्ता करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी नाल्यावरील झाडे तोडली जात असल्याने याबाबत स्थानिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी सदर ठिकाणी भेट देऊन कारवाई करण्याची सूचना केल्याने बुधवारी झोनल आयुक्त अनिल बोरगावी यांनी खासबाग येथे भेट देऊन सुरू असलेली वृक्षतोड थांबविण्याची सूचना केली. त्याचबरोबर लेआऊट पाडलेल्या मालकाला महापालिका आयुक्तांची भेट घेण्याची सूचना करण्यात आली.
खासबाग येथे खासगी लेआऊट करण्यात आले आहे. लेआऊटकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने त्याठिकाणाहून गेलेल्या नाल्यावरून रस्ता करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सदर नाला महापालिपेच्या मालकीचा असून नाल्यात मोठमोठी झाडे आहेत. विशेषकरून निलगिरी झाडांचा भरणा अधिक आहे. नाल्यावरून रस्ता झाल्यास नाल्यातील पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होणार आहे. त्यामुळे सदर वृक्षतोड थांबविण्यात यावी यासाठी स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी, तसेच महापौरांकडे निवेदनाद्वारे मागणीही केली होती. या मागणीची दखल घेत मनपा आयुक्त शुभा बी. यांनी महसूल अधिकाऱ्यांना यावर कारवाई करण्याची सूचना केली.
त्यामुळे बुधवारी महसूल अधिकारी तथा झोनल आयुक्त अनिल बोरगावी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खासबाग येथील त्या खासगी लेआऊटला भेट दिली. त्यावेळी नाल्यावरून रस्ता करण्यासाठी झाडांची कत्तल केली जात असल्याचे दिसून आले. याबाबत वनखात्याकडून रितसर परवानगी घेण्यात आली आहे का? अशी विचारणा अधिकाऱ्यांनी केली. त्यावर परवानगी घेतली असल्याचे लेआऊटच्या मालकाने सांगितले. सरकारी नाल्याच्या जागेतील झाडे तोडण्यास परवानगी कशी मिळाली? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यामुळे सदर वृक्षतोड थांबविण्याची सूचना करण्यात आली.
नाल्याच्या जागेतील झाडे तेथील शेतकऱ्यांनी एकाला पैसे घेऊन विक्री केल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. लेआऊटच्या ठिकाणी अधिकारी गेल्यानंतर त्याठिकाणी मालक नव्हता. त्यामुळे त्याच्याशी फोनवर संपर्क साधण्यात आला. नागरिकांनी तक्रार केली असल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेण्याची सूचना यावेळी अधिकाऱ्यांनी लेआऊट मालकाला केली. नव्याने करण्यात आलेले खासगी लेआऊट बेकायदा असल्याची चर्चा सुरू आहे. लेआऊट पाडताना जिल्हाधिकाऱ्यांकडून सदर जागेचे भूपरिवर्तन करून घेणे गरजेचे असते. मात्र त्याठिकाणचे लेआऊट सर्व्हे नंबरमध्ये शेती जमिनीत केल्याची शक्यता असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.









