15 किलोऐवजी प्रत्यक्षात 12 किलो तांदूळ वितरण : कमी कोटा आल्याचे उत्तर
प्रतिनिधी/ बेळगाव
बीपीएल रेशनकार्डधारकांना अन्नभाग्य योजनेंतर्गत मार्च महिन्यात प्रतिव्यक्ती 15 किलो तांदूळ देण्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. मात्र प्रत्यक्षात केवळ 12 ते 13 किलोच तांदळाचे वितरण रेशनदुकानांवर केले जात आहे. यामुळे कार्डधारक व रेशनदुकानदारांमध्ये वादावादी होत आहे. सरकारने जाहीर केले असतानाही रेशनदुकानदार पूर्ण तांदूळ देण्यास तयार नसल्याची तक्रार केली जात आहे.
राज्य सरकारकडून रेशनकार्डधारकांना प्रतिव्यक्ती 5 किलो तांदूळ दिले जात होते. तसेच उर्वरित 5 किलो तांदळाची रक्कम डीबीटी माध्यमातून बँक खात्यात जमा केली जात होती. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस बँक खात्यात पैसे जमा करण्याऐवजी 5 किलो तांदूळ देण्याचा निर्णय झाला. यामुळे यापुढे प्रत्येक महिन्याला प्रतिव्यक्ती 10 किलो तांदूळ दिला जाणार आहे. फेब्रुवारी महिन्यात उशिराने निर्णय झाल्याने त्या महिन्याचे 5 किलो तांदूळ मार्चमध्ये दिले जात आहेत. त्यामुळे या महिन्यात प्रतिव्यक्ती 15 किलो तांदूळ दहा तारखेपासून वितरित केले जात आहेत.
मार्च महिन्यात 15 किलो तांदूळ मिळतील, असे राज्य सरकारने, तसेच अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री एच. मुनियप्पा यांनी स्पष्ट केले होते. परंतु, प्रत्यक्षात रेशनदुकानांवर प्रतिव्यक्ती 12 किलो तांदूळच दिले जात आहेत. उर्वरित 3 किलो तांदूळ कुठे गेले? याचे उत्तर मात्र अनुत्तरित आहे. रेशनदुकानदारांना याबाबत विचारणा केली असता जितका धान्याचा कोटा आला आहे, तितकेच वितरण करण्यात येत असल्याचे उत्तर देण्यात येत आहे. परंतु, यामुळे दुकानदार व नागरिकांमध्ये वाद होत आहे.
पूर्ण 15 किलो तांदूळ देण्याची सूचना
तांदळाची सरकारकडून रेशनदुकानदारापर्यंत वाहतूक होताना पोत्यातील तांदळाची नासाडी होते. यामुळे ती तूट भरून काढण्यासाठी काही प्रमाणात कमी तांदूळ ग्राहकांना द्यावा लागतो. परंतु, सर्व दुकानदारांना आम्ही संदेश पाठविला असून पूर्ण 15 किलो तांदूळ देण्याची सूचना करण्यात आली आहे.
– शेखर तळवार, रेशनदुकानदार असोसिएशन राज्य उपाध्यक्ष









