कोल्हापूर :
बनावट नोटा छापल्याप्रकरणी रेव्हेन्यु इंटेलिजन्स विभागाने गुरुवारी कोल्हापूरात छापा टाकला. या प्रकरणी करवीर पोलिसांनी सिद्धेश श्रीकांत घाटगे (वय 26 रा. दत्तोबा शिंदे नगर, कळंबा) याला अटक केली आहे. त्याच्याकडून ए 4 साईजचे चार पेपर पोलिसांनी जप्त केले आहेत. हे पेपर थेट हाँगकाँग वरुन मागविल्याचे तपासात समोर आले आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी सिद्धेश घाटगे याला न्यायालयात हजर केले असता मंगळवार (25 फेब्रुवारी) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भारतीय नोटांच्या डुप्लीकेशनसाठी लागणारा कागद कोल्हापूरात कुरिअरद्वारे मागविण्यात आल्याची माहिती डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्स मुंबई विभागीय कार्यालयास मिळाली होती. यानुसार मुंबई आणि पुणे येथील एक पथक गुरुवारी सकाळी कोल्हापूरात दाखल झाले होते. हे कुरिअर कळंबा येथील सिद्धेश घाटगे याच्या पत्यावर गेल्याचे समोर आले होते. यानंतर या पथकाने करवीर पोलिसांशी संपर्क साधला. करवीर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर शिंदे यांच्यासह डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यु इंटेलिजन्सच्या पथकाने कळंबा येथे गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिद्धेश घाटगे याच्या घरी छापा टाकला. यावेळी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या घराची झडती घेतली असता, त्यामध्ये ए 4 साईजचे चार पेपर आढळून आले. त्यामध्ये एका कागदावर 50 रुपयांच्या सहा नोटा छापण्यात आल्या होत्या. दुसऱ्या कागदावर 200 रुपयांच्या चार नोटा छापण्यात आल्या होत्या. तिसऱ्या कागदावर 500 रुच्या चार नोटा छापल्याचे आढळले. तसेच चौथ्या कोऱ्या पेपरवर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेली रंगीत पट्टी व त्यावर आरबीआय व भारत छापण्यात आले होते. याचसोबत एका कुरिअर कंपनीचा लिफाफा आढळून आला त्यावर हाय सिक्युरिटी थ्रेड असलेला पेपर अशी खुन करण्यात आली होती. याचसोबत 200 रुपयांची एक बनावट फाटलेली नोटही आढळून आली. यानंतर करवीर पोलिसांनी सिद्धेश घाटगे याला अटक केली. शुक्रवारी सकाळी त्याला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला मंगळवार (25 फेब्रुवारी) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा गळवे करत आहेत.
- 30 पैकी 4 पेपर ताब्यात
हाँगकॉंग वरुन मागविण्यात आलेल्या कुरिअरमध्ये 30 पेपर होते. मात्र सिद्धेश घाटगे याच्या घरातून केवळ 4 पेपर जप्त करण्यात आले आहेत. उर्वरीत 26 पेपर कुणीकडे गेले याचा शोध करवीर पोलीस घेत आहेत. या पेपरचा वापर करुन आणखीन बनावट नोटा छापण्यात आल्या आहेत काय याचा उलगडाही होणार आहे.
- दुचाकी खरेदी विक्री
सिद्धेश घाटगे हा कळंबा येथे राहत असून, तो दुचाकी खरेदी विक्री करण्याचा व्यवसाय करतो. तसेच दुचाकींची दुरुस्ती करुनही तो आपला उदरनिर्वाह करत होता. मात्र तो दुचाकी चोरीमध्ये सहभागी आहे काय या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत. सिद्धेशची माहिती गोळा करण्याचे काम सुरु असून, लवकरच या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे.
- यापूर्वीही नोटा छापल्या काय
सिद्धेश घाटगे याने अशाच प्रकारे यापूर्वीही नोटा छापल्या आहेत काय याचा तपास सुरु आहे. त्याने या नोटा कशासाठी तयार केल्या होत्या. तो या नोटा कोठे खपविणार होता याचीही चौकशी सुरु आहे.
- अन्य साथीदारांचा शोध सुरु
सिद्धेश घाटगे याने हाय सिक्युरिटी असलेला हा कागद हाँगकाँग वरुन मागविला होता. त्याने भारतीय चलनी नोटांची छपाई कोठे केली. त्याच्यासोबत या रॅकेटमध्ये अजून कोण कोण आहे. याचा उलगडा होणे आवश्यक आहे. सिद्धेशच्या चौकशीमध्ये या सर्व गोष्टींचा उलगडा झाल्यानंतर यामागचे रॅकेट समोर येणार आहे. सिद्धेशच्या घरातून छपाईची साधन सामग्री आढळलेली नाही. त्यामुळे याची छपाई कोठे करण्यात आली याचा शोध पोलीस घेत आहेत.
- जशाच्या तसा कागद
भारतीय चलनी नोटांच्या छपाईसाठी लागणारा कागद हा हायसिक्युरीटमध्ये असतो. मात्र सिद्धेशने हा कागद हाँगकाँगवरुन मागविला होता. भारतीय नोटांच्या छपाईसाठी लागणाऱ्या कागदाप्रमाणेच हा कागद असल्यामुळे तपास यंत्रणाही चक्रावून गेल्या आहेत. सिद्धेशने हा कागद कशा पद्धतीने मागविला, तो किती रुपयांना खरेदी केला. त्याचे पेमेंट कसे पाठविले याचा शोध घेण्यात येणार आहे.








