माळमारुती पोलिसांकडून वेटरसह चौघांना अटक : महांतेशनगर येथील घटना : आरोपींना रावडी शिटर यादीत दाखल
बेळगाव : टिश्यू पेपर देण्यास विलंब केल्याने ग्राहकाने वेटरला शिवीगाळ करून मारहाण केली. त्यानंतर संतापलेल्या वेटरने आपल्या अन्य तिघा मित्रांना त्याठिकाणी बोलावून घेऊन ग्राहकावर जांबियाने सपासप वार करण्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याची घटना सोमवारी रात्री दहाच्या सुमारास महांतेशनगर येथील आशीर्वाद बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये घडली आहे. प्रशांत सिद्राय सत्यनाईक (रा. रामतीर्थनगर) असे जखमीचे नाव असून याप्रकरणी माळमारुती पोलिसांनी वेटरसह चौघा हल्लेखोरांना अटक केली आहे. आरोपींची रवानगी कारागृहात करण्यात आली असून सर्वांना रावडी शिटर यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. किरण उमेश चौडप्पण्णवर (वय 29 रा. आदलकट्टी, ता. यरगट्टी), अलेन उर्फ रोहन इस्रेल नायर (वय 23, रा. रुक्मिणीनगर, सहावा क्रॉस), रोहित यल्लाप्पा धारवाड (वय 25, रा. रुक्मिणीनगर) आणि ओंकार जनार्दन इळगे (वय 25, रा. इळगे गल्ली, चंदगड-कोल्हापूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत पोलिसांतून समजलेली अधिक माहिती अशी की, प्रशांत सत्यनाईक हे सोमवारी रात्री महांतेशनगर येथील आशीर्वाद बार अॅण्ड रेस्टॉरंटमध्ये गेले होते. त्याठिकाणी रात्री 10 च्या सुमारास त्यांनी वेटर किरण याच्याकडे टिश्यू पेपर देण्याची मागणी केली. टिश्यू पेपर देण्यास विलंब झाल्याने दोघांमध्ये वादावादी झाली. यावेळी वेटरला मारहाण करण्यासह शिवीगाळ करण्यात आल्याने रागाच्या भरात वेटर किरणने आपल्या अन्य तिघा मित्रांना बोलावून घेतले. चौघांनी प्रशांतवर धारदार जांबियाने चार-पाच ठिकाणी सपासप वार केले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच जातीवाचक शिवीगाळदेखील केली. त्यामुळे याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात खुनाचा प्रयत्न करण्यासह अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी तपास करून याप्रकरणी मंगळवारी वरील संशयितांना अटक करून त्यांची रवानगी हिंडलगा कारागृहात केली आहे. या प्रकरणाचा तपास मार्केटचे साहाय्यक पोलीस आयुक्त संतोष सत्यनाईक करत आहेत. बारमध्ये ग्राहकावर प्राणघातक हल्ला करण्यासह जातीवाचक शिवीगाळ केल्याने वरील सर्व चौघांना रावडी शिटर यादीत दाखल करण्यात आले आहे.









