कन्नडचा उल्लेख नसल्याने शुभेच्छा फलक हटविले : मनपाच्या कारवाईने संताप
बेळगाव : दसरोत्सवासाठी शुभेच्छा देणारे फलक याचबरोबर काही व्यावसायिकांचे फलकावरील 60 टक्के जागेवर कन्नडमध्ये लिहिले पाहिजे म्हणून धर्मवीर संभाजी चौक येथील फलक हटविण्याचा प्रताप महापालिकेने केला आहे. यावेळी विविध व्यावसायिकांनी याचबरोबर नागरिकांनी अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर कन्नडमध्ये लिहिले पाहिजे, असे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सध्या नवरात्रोत्सवाच्या शहरातील जनतेला शुभेच्छा देण्यासाठी अनेकांनी फलक लावले होते. याचबरोबर विविध सार्वजनिक मंडळांनी दुर्गादेवी मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यासाठी मंडप घातला असून मंडपावरदेखील मराठी फलक होते. ते देखील काढून नेले आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सरकारच्या आदेशाचे पालन करत असल्याचे सांगत आहेत. महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, हे सायंकाळी धर्मवीर संभाजी चौक येथे दाखल झाले.
त्यानंतर महसूल अधिकारी संतोष अन्नीशेट्टर, निरीक्षक कलावती अडमनी यांच्या मार्गदर्शनाखाली हे फलक हटविण्यात आले. यावेळी व्यावसायिकांनी तसेच युवा म. ए. समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, नगरसेवक शिवाजी मंडोळकर दाखल झाले. यावेळी सरकारच्या आदेशाची मागणी करण्यात आली. मात्र तसा कोणताच आदेश नसल्याचे दिसून आले. सध्या दसरोत्सव सुरू आहे. त्यामुळे सर्वजण विविध धार्मिक कार्यामध्ये गुंतले आहेत. अनेक जण शुभेच्छा देत आहेत. अशावेळी अचानकपणे कारवाई केल्यामुळे महापालिकेबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कारवाईमुळे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
अधिकाऱ्याच्याच तोंडात गुटखा
महसूल अधिकारी संतोष अन्नीशेट्टर यांच्या तोंडामध्ये गुटखा होता. गुटखा खाऊन ते तरुणांशी बोलत होते. त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. महापालिकेच्यावतीने तंबाखूजन्य पदार्थविरोधी कारवाई केली जाते. महापालिकेचेच अधिकारी गुटखा खावून कारवाई करत आहेत. याचबरोबर जनतेशी बोलतात. हे योग्य आहे का? त्यांच्याविरोधात महापालिका आयुक्त कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
धारेवर धरताच फलक दिले वापस
महापालिकेच्या या अन्यायकारक कारवाईनंतर मराठी भाषिक दाखल झाले. त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलाच जाब विचारला. त्यानंतर थातूरमातूर उत्तरे दिली. काहीजणांचे फलक परत दिले. तर काही फलक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी नेले. या कारवाईमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.









