काम करण्यासाठी 35 वय अत्यंत अधिक, निवृत्तीसाठी 60 हे वय अत्यंत कमी
‘कर्स ऑफ 35’ चीनच्या इंटरनेटजालावर एक चर्चेचा विषय ठरला आहे. हा विषय नेमका कसा सुरू झाला आणि यात कितपत सत्य आहे हे सांगणे अवघड आहे. परंतु चीनमध्ये बेरोजगारी आणि वयामुळे भेदभाव मोठ्या प्रमाणावर आहे यात दुमत नाही.
30 वर्षांपासून अधिक वय असलेले आणि स्वत:ची कारकीर्द, विवाह आणि मुलांविषयी मोठे निर्णय घेत असलेल्या लोकांसाठी हा दुहेरी मार आहे. काम करण्यासाठी 35 वर्षे वय अत्यंत अधिक आणि निवृत्त होण्यासाठी 60 वर्षे अत्यंत कमी असल्याचे एका व्हायरल होत असलेल्या ऑनलाइन पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. याच अर्थ काम करण्याच्या वयात लोकांकडे रोजगाराची कमतरता आहे आणि वृद्ध लोकांना काम करत राहण्याची गरज असू शकते, कारण सरकार सेवानिवृत्तीचे वय वाढविण्याचा विचार करत आहे.

घर, कार खरेदी, विवाह, मुले, वाहतूक आणि अमली पदार्थांपासून दूर रहा आणि तुमच्याकडे आनंद, स्वातंत्र्य आणि वेळ असेल असे या पोस्टमध्ये म्हटले गेले आहे. चीनमध्ये स्थिर नोकरी असणारे लोक म्हणजेच सरकारी कर्मचारी अणि शिक्षकच विवाह अन् कुटुंब सुरू करण्याचा खर्च पेलू शकतात.
चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार मागील वर्षी चीनचा जन्मदर नीचांकी स्तरावर पोहोचला आज्णि 1961 नंतर पहिल्यांदाच चीनच्या लोकसंख्येत घट झाली आहे. कोरोनानंतर चीनच्या आर्थिक स्थितीत होत असलेल्या घसरणीमुळे तरुण-तरुणी विवाह करणे टाळत आहेत.
बेरोजगारांची मोठी संख्या
चीनच्या सर्वात मोठ्या रियल इस्टेट डेव्हलपर्सने 2022 मध्ये स्वत:च्या कर्मचारी संख्येत 30 ते 70 टक्क्यांची कपात केली आहे. तर अलीबाबा, टेनसेंट आणि बैदू यासारख्या मोठ्या कंपन्यांनी देखील 9 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. 2028 पर्यंत चीनमध्ये 16-40 वयोगटातील 5 कोटी लोक बेरोजगार असतील असा अनुमान आहे.









