भोजनावळीच्या निमित्ताने राजकीय मुद्द्यांवर चर्चेची शक्यता
बेंगळूर : राज्यात मुख्यमंत्री बदल, मंत्रिमंडळ पुनर्रचनेवर चर्चा रंगली असतानाच माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी शुक्रवारी मंत्री आणि काही आमदारांसाठी भोजनावळीचे (डिनर पार्टी) आयोजन केले आहे. तुमकूर येथे होणाऱ्या या पार्टीसाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री आणि काही आमदारांना राजण्णा यांनी निमंत्रण दिले आहे. सातत्याने पक्षातील घडामोडींवर उघडपणे वक्तव्य केल्याने राजण्णा यांना मंत्रिपद गमवावे लागले होते. आता डिनर पार्टीचे आयोजन केल्याने ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
‘नोव्हेंबर क्रांती’विषयी राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगलेली असताना उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार बुधवारी दिल्ली दौऱ्यावर गेले. त्यापाठोपाठ तुमकूरमधील निवासस्थानी माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी मंत्र्यांसाठी डिनर पार्टीचे आयोजन केले आहे. यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासह अनेक मंत्री सहभागी होण्याची शक्यता आहे. डिनर पार्टीच्या निमित्ताने राजकीय मुद्द्यांवर चर्चा होणार असल्याचे समजते.
गृहमंत्री परमेश्वर यांची प्रतिक्रिया
माजी मंत्री के. एन. राजण्णा यांनी डिनर पार्टी नव्हे तर भोजनासाठी निमंत्रण दिले आहे. तेथे कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा होणार नाही. यापूर्वी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे तीन वेळा राजण्णा यांच्या घरी जेवणासाठी गेले होते, अशी प्रतिक्रिया गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी दिली.









