सरकारने ’बफर स्टॉक’मधील कांदा उतरवला बाजारात : 25 रुपये प्रतिकिलोने विक्री, ग्राहकांना दिलासा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कांद्याच्या वाढत्या भावामुळे सर्वसामान्यांच्या आहारातून कांदा पुन्हा गायब होत असून, यावर कडक कारवाई करत केंद्र सरकारने कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी नवा निर्णय घेतला आहे. ज्या राज्यांमध्ये किमती झपाट्याने वाढत आहेत, तेथे ‘बफर स्टॉक’मधून कांदा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने घेतला आहे. कांद्याच्या सरासरी किरकोळ किमतीत 57 टक्क्यांनी वाढ झाल्याने केंद्राने ग्राहकांना दिलासा देत शुक्रवारी ‘बफर स्टॉक’मधून कांद्याची किरकोळ बाजारात 25 रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने विक्री करण्याचा निर्णय घेतला.
दसऱ्यानंतर किरकोळ बाजारात कांद्याचा खप झपाट्याने वाढला आहे. त्याचप्रमाणे दरातही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कांद्याच्या अखिल भारतीय सरासरी किरकोळ किमतीत 57 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. प्रामुख्याने हवामानाशी संबंधित समस्या आणि काढणीला उशीर झाल्यामुळे कांदा दरवाढ झाल्याचा दावा केला जात आहे. तथापि, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘बफर स्टॉक’मधून बाहेर काढलेला कांदा प्रतिकिलो 25 रुपयांनी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
ऐन सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या काळात कांद्याचे वाढते भाव हे सरकारसाठी चिंतेचे कारण ठरत आहे. नवीन खरीप कांद्याची आवक झाल्यानंतर कांद्याचे भाव मंदावण्याची अपेक्षा आहे. मात्र, अद्यापपर्यंत पीक येण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सरकारने आता सरकारी विक्रीतून कांद्याचे वाढलेले भाव आटोक्यात आणण्याचा मार्ग शोधला आहे.
आतापर्यंत सरकारी गोदामात सुमारे 7 लाख टन कांद्याचा बफर स्टॉक आहे. या साठ्यातील ठराविक हिस्सा केंद्राकडून हळूहळू देशातील घाऊक बाजारात उपलब्ध केला जाईल. दिवाळीच्या आसपास हे प्रमाण वाढेल. नजिकच्या काळात 16 राज्यांच्या बाजारपेठेत सुमारे 1.7 लाख टन कांदा दाखल होण्याची शक्यता आहे. पुढील टप्प्यात दिवाळीपूर्वी घाऊक बाजारात मोठी खेप दाखल केली जाणार आहे. अशास्थितीत दिवाळीच्या आसपास कांद्याचे भाव उतरण्याची शक्यता आहे.
नोव्हेंबरच्या अखेरीस खरीप कांद्याची आवक सुरू होईल. अशा स्थितीत कांद्याचे भाव आपोआप नरमले जातील अशी अपेक्षा आहे. सरकारने एक महिन्याची रणनीती तयार केली आहे. सरकारी पावले पाहता आता घाऊक बाजारातही कांद्याच्या दरात फारशी वाढ होण्याची अपेक्षा नाही. आठवडाभर वाढीचा कल कायम राहिल्यानंतर किमती पुन्हा नियंत्रणात येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी याच कालावधीत कांद्याची अखिल भारतीय सरासरी किरकोळ किंमत 30 रुपये प्रतिकिलोवरून शुक्रवारी 47 रुपये प्रतिकिलो झाली. आकडेवारीनुसार, राष्ट्रीय राजधानीत शुक्रवारी कांद्याची किरकोळ किंमत 40 रुपये प्रतिकिलो होती, तर वर्षभरापूर्वी याच काळात ती 30 रुपये प्रतिकिलो होती.









