ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा : मिशेल मार्शकडे कर्णधारपदाची सूत्रे
वृत्तसंस्था/ सिडनी
मायदेशात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची तीन सामन्यांची टी 20 मालिका जिंकल्यानंतर आता उभय संघात एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. सोमवारी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघातून स्टीव्ह स्मिथला वगळण्यात आले आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची शक्यता आहे. त्याच वेळी, कसोटी संघाबाहेर असलेल्या मार्नस लाबुशेन पुनरागमन करणार आहे.
मिशेल मार्शकडे ऑस्ट्रेलियन संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धुरा टेंबा बवूमाकडे असेल. दरम्यान, आफ्रिकेविरुद्ध या मालिकेसाठी दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स आणि मिशेल स्टार्कला विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी स्टीव्ह स्मिथही दुखापतग्रस्त असल्याने या मालिकेत खेळू शकणार नाही. याचवेळी, कॅमेरुन ग्रीन देखील या मालिकेत पुनरागमन करणार आहे. निवड समितीने लाबुशेनवरही विश्वास दाखवताना त्याला संघात स्थान दिले आहे. उभय संघातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला 19 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. दुसरा सामना 22 ऑगस्ट तर तिसरा सामना 24 ऑगस्ट रोजी मॅके येथेच खेळवला जाईल.
आफ्रिकेविरुद्ध वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ – मिशेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, अॅलेक्स केरी, बेन द्वारशुइस, कूपर कॉनोली, नॅथन एलिस, कॅमेरुन ग्रीन, आरोन हार्डी, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मार्नस लाबुशेन आणि अॅडम झम्पा.









