वृत्तसंस्था / कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया)
पाकविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अष्टपैलू पॅट कमिन्सकडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र या मालिकेसाठी ट्रेविस हेड, मिचेल मार्श उपलब्ध राहू शकणार नाहीत.
मिचेल मार्श आणि ट्रेविस हेड हे ऑस्ट्रेलियन संघातील स्फोटक फलंदाज म्हणून ओळखले जातात. दरम्यान मार्श आणि हेड हे लवकरच पिता होणार असल्याने त्यांनी या मालिकेसाठी आपण उपलब्ध होऊ शकणार नाही, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाला यापूर्वीच सुचित केले आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 4 नोव्हेंबरपासून खेळविली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना मेलबोर्नमध्ये तर शेवटचा सामना 10 नोव्हेंबरला ऑप्टस् स्टेडियममध्ये होईल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आणि पाक यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिका आयोजित केली आहे.
या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने 14 सदस्यांचा संघ जाहीर केला असून कमिन्सकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दरम्यान अष्टपैलु कॅमरुन ग्रीन दुखापतीमुळे या मालिकेत खेळू शकणार आहे. आगामी चॅम्पियन करंडक स्पर्धेपूर्वीची पाक संघाची ही शेवटची वनडे मालिका आहे. पुढील वर्षी आयसीसीची चॅम्पियन करंडक क्रिकेट स्पर्धा पाकिस्तानमध्ये भरविली जाणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात इंग्लीस हा एकमेव अष्टीरक्षक राहिल. मॅथ्यु शॉर्ट आणि मॅकगर्क यांना या मालिकेसाठी चांगली कामगिरी करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलिया वनडे संघ: कमिन्स (कर्णधार), अॅबॉट, कोनोली, मॅकगर्क, हार्डी, हॅजलवूड, इंग्लीस, लाबुशेन, मॅक्सवेल, शॉर्ट, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, स्टोईनीस आणि झाम्पा









