लहानपणी शाळेत इतिहास शिकताना मोहनजादाडो आणि हडप्पा या शहरांचा उल्लेख वाचला होता. त्याची चित्रं, त्याचे ते भग्नावशेष बघताना खूप मजा वाटायची. तिथे सापडलेल्या दगडांवर कोरलेल्या मूर्ती वेगवेगळी आभूषणं घातलेल्या वेगळ्या प्रकारचे कपडे ल्यायलेल्या अशा पाहिल्या की, त्या काळात ही माणसं इतक्या सुंदर पद्धतीने कशी राहत असतील? असाही प्रश्न पडायचा. कारण या काळात प्रचंड धडपडीतून कसंबसं जीवन जगणारा माणूस कलेकडे कसा काय वळला असेल? असेही प्रश्न मनात यायचे. कुठलीही साधन संपत्ती उपलब्ध नसताना असलेल्या गोष्टीतूनच साज शृंगार केले जायचे. त्याच्यामध्ये फुलांचे रंग, वेलींची नक्षी यांचा समावेश असायचा. चित्रकलेत झाडांची, पक्षी, प्राण्यांची चित्रे चितारली जायची. या सगळ्यातून माणसाच्या मनात असलेल्या काल्पनिक गोष्टी समोर येतात आणि हे सगळं आपल्यासाठी करून ठेवणारे लोक जरी काळाआड गेले असले तरी त्यांच्याबद्दल आम्ही मात्र अगदीच उदासीन राहिलो. आम्ही कधी कशाचा शोध घेतला नाही किंवा कोणत्या कलाही आत्मसात केल्या नाहीत. मधला काळ हा असाच गेला. आमच्या देशात व्यापारासाठी आलेले इथली संपत्ती आणि कलाकृती पाहून इथले सत्ताधीश झाले. अनेक टोळ्यांनी भारतावरती हल्ले केले आणि हे हल्ले करताना फक्त संपत्तीच घेतली नाही तर इथली संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न केला गेला. इतिहासाच्या पाऊलखुणा पुसण्याचा तो प्रयत्न होता. तक्षशिला, नालंदा या विद्यापीठातील ग्रंथसंपदा जाळणारे इथले सत्ताधारी बनले. त्यानंतर आलेले ब्रिटिशदेखील व्यापाराच्या निमित्ताने येऊन इथली सत्ता इथले राज्य हस्तगत करणारे ठरले पण हे करत असताना त्यांनी जाणीवपूर्वक इथली संस्कृती आणि कला अगदी वेदसुद्धा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. ब्रिटिशांनी जाता जाता शनिवार वाडादेखील जाळून टाकण्याच्या मागे हेच कारण होतं. नुसत्या वैभवाच्याच खुणांना मिटवतांना तुमचा इतिहासच मिटवला तर आपोआपच तुम्हाला आपला देश दरिद्री उदासीन वाटायला लागतो. परंतु आमच्या येथील कलाकारांनी किंवा चित्रकारांनी असं काही काम करून ठेवलं की आज जगाला त्याची दखल घ्यायला लागली. भलेही जगाने या सगळ्या कलेबद्दल इतिहासात कुठेही आमचा उल्लेख केला नसला तरीही त्या कलेचा अभ्यास करायला आता साऱ्या जगभरातून माणसं भारताकडे वळायला लागलेली आहेत. संस्कृती संपवण्याचा प्रयत्न झाला तरीही ती टिकवता येते हे मात्र भारताने जगाला दाखवून दिलेले आहे. भारताला भलेही जगाच्या पातळीवर फार मोठा मान कधीच मिळाला नसला तरी पाश्चिमात्यांनी आता त्याची दखल घ्यायला सुरुवात केली आहे. भारतीय कलेचा प्रसार जगासमोर जरी आला नसला तरीही कला संस्कृती आजही सगळ्यांना विचार करायला लावतेच आहे, याचं श्रेय संस्कार भारतीच्या श्री हरिभाऊ वाकणकर यांना द्यायलाच हवं. साऱ्या अज्ञात कलाकारांना देखील त्यांनी जगाच्या समोर आणण्याचा जो प्रयत्न केला त्यासाठी त्यांना शतश: प्रणाम. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय पुरातत्व खातं निर्माण होण्याच्या काळात या सगळ्या कलाकारीचा उल्लेख आमच्यासमोर यायला लागला. त्याआधी भारताचाच भाग असलेली मोहनजोदाडो आणि हडप्पा या कलेचाच अभ्यास फक्त केला जायचा. परंतु विसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय पुरातत्त्व खातं निर्माण होण्याच्या काळात या सगळ्या कलाकारीचा उल्लेख आमच्यासमोर यायला लागला. त्याआधी 1950 च्या आसपास ‘भीम बेटकाच्या’ शोधामुळे अभ्यासाला गती आली. अशा संशोधकांचे दीपस्तंभ ठरले ते म्हणजे श्री हरिभाऊ वाकणकर त्यांची हीच संशोधन वृत्ती पुढे सरस्वती नदीच्या शोधनाने कलेच्या गंगेचा प्रवाह प्रवाहित करणारी ठरली. कलेच्या प्रवाहाला सामान्य जनापर्यंत आणणारे ते आजच्या युगातले भगीरथ ठरले. अशी माणसं जेव्हा मोठं कार्य उभारतात त्यावेळी फक्त माणसं, समाज, राष्ट्र, एवढ्याच संकल्पनांचे भांडवल त्यांच्या गाठीशी असतं. स्वत:च्या स्वप्नांसाठी जगामध्ये हजारो जगतात पण राष्ट्राचे स्वप्न जगणारी थोडीफार माणसं या जगात असतातच. आज हजारो वर्ष आक्रमण सोसून आमची कला नष्ट करण्याचा प्रयत्न होऊन देखील आम्ही का टिकाव धरू शकलो? कारण आमची कलेतील काही प्रतिक नष्ट झाली तरी त्याची संकल्पना जपणारी आमची स्वप्न कायम ठेवणारी, संस्कृती इथे असल्यामुळे ती माणसामाणसात रुजली.
Previous Article400 रुपयांच्या वादातून 3 जणांची हत्या
Next Article जगभरात सस्टेनेशबल ट्रॅव्हलिंगचा वाढता ट्रेंड
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








