पावसाला सुरुवात झाल्यामुळे बळीराजाची धडपड : बांधावर दोन ओळीने लागवड : मजुरांची टंचाई
वार्ताहर /किणये
शनिवारपासून तालुक्यात पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे. समाधानकारक पाऊस होत असल्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी वेल लागवडीच्या कामाला जोर आला आहे. या भागातील शेतकरी रविवारी दिवसभर रताळी वेल लागवड करतानाचे चित्र पहावयास मिळाले. एकाचवेळी शेतकऱ्यांनी लागवडीला सुरुवात केली असल्यामुळे शेतमजुरांची टंचाई भासत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, बेळवट्टी, बिजगर्णी, कावळेवाडी, जानेवाडी, वाघवडे, बामनवाडी, बाळगमट्टी, किणये, बहाद्दरवाडी, संतीबस्तवाड आदी भागात शेतकरी रताळी लागवड करू लागले आहेत. गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच शेतकऱ्यांनी शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने रताळी बांध (मेरा )तयार करून घेतलेले आहेत. हे बांध तयार करण्यासाठी ट्रॅक्टरला प्रतितासाला 550 ते 600 रुपये इतके भाडे शेतकऱ्यांनी दिलेले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा खरीप हंगामात रताळी लागवड दुप्पटीने करण्यात येणार आहे. त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी बांध तयार करून घेतलेले आहेत. अलीकडे शेतकरी उन्हाळ्यातही कूपनलिका व विहिरीच्या पाण्यावर रताळी लागवड करू लागले आहेत. उन्हाळी लागवड करण्यात आलेल्या रताळ्dयाची काढणी काही शेतकरी करीत आहेत. मात्र या रताळ्याला योग्य हमीभाव मिळत नसल्याच्या तक्रारी शेतकरीवर्गातून होऊ लागल्या आहेत. पाण्याचा निचरा होणारी माळरानावरील लालसर व काळपट जमीन रताळी लागवडीसाठी उपयुक्त आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रताळी लागवड मोठ्याप्रमाणात करण्यात येते. यासाठी शेतकऱ्यांनी बांधावर शेणखत घातलेले आहे.
एकरी 20 हजार खर्च
रताळी बांध तयार करण्यासाठी ट्रॅक्टर भाडे, शेणखत, रासायनिक खत, शेतमजूर आदी मिळून एकरी 20 हजार इतका खर्च येत असल्याची माहिती काही शेतकऱ्यांनी दिली आहे. खरीप हंगामातील रताळी लागवड करण्यासाठी एप्रिल महिन्यात बियाणासाठी रताळी वेल शेतकऱ्यांनी लावली होती. ही वेल सध्या लावण्यासाठी सज्ज झाली आहे. सकाळी लवकर उठून शेतकऱ्यांनी रताळी वेलची कापणी केली. त्यानंतर ट्रॅक्टर व बैलगाडीतून रताळी वेल लागवडीच्या ठिकाणी नेताना शेतकरी दिसत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी रताळी बांध तयार करून ठेवण्यात आले होते. मात्र पावसाने हुलकावणी दिल्यामुळे ही लागवड खोळंबली होती. गेल्या दोन दिवसापासून पाऊस सुरू झाल्यामुळे रताळी लागवडीच्या कामांना जोर आला आहे. एकाचवेळी सर्व शेतकरी लागवडीच्या कामात गुंतले असल्यामुळे शेतमजुरांची टंचाई मोठ्याप्रमाणात निर्माण झाली असल्याची माहिती रताळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिली आहे.
दोन ओळीने लागवड
तयार करण्यात आलेल्या बांधावर (मेरांवर)रताळी वेल दोन ओळीने लावण्यात येत आहे. पूर्वी याच बांधावर तीन ओळी पद्धतीने लागवड करण्यात येत होती. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून सर्रास शेतकरी दोन ओळीप्रमाणे लागवड करत आहेत. कारण दोन ओळीने लागवड करणे सोयीस्कर होत आहे व ही लागवड लवकर होऊ लागली आहे.









