बटलरचे अर्धशतक, सामनावीर अश्विन-चहलचे प्रत्येकी 2 बळी, धोनी-जडेजाचे प्रयत्न अपुरे
वृत्तसंस्था/ चेन्नई
जोस बटलरने नोंदवलेले अर्धशतक, देवदत्त पडिक्कल, रविचंद्रन अश्विन, शिमरॉन हेतमेयर यांनी केलेले उपयुक्त योगदान आणि फिरकी गोलंदाजांनी केलेली अप्रतिम कामगिरी यांच्या आधारे राजस्थान रॉयल्सने आयपीएलमधील रोमांचक ठरलेल्या साखळी सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सचा केवळ 3 धावांनी पराभव करून तिसरा विजय नोंदवत गुणतक्त्यात 6 गुणांसह अग्रस्थानी झेप घेतली. 30 धावा व 2 बळी टिपणाऱया आर.अश्विनला सामनावीराचा बहुमान मिळाला.

कर्णधार म्हणून आयपीएलमधील 200 वा सामना खेळणाऱया धोनीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱया राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत 8 बाद 175 धावा जमविल्या. त्यानंतर चेन्नईला 20 षटकांत 6 बाद 172 धावांवर रोखत राजस्थानने केवळ 3 धावांनी रोमांचक विजय मिळविला. आयपीएलमधील रोमांचक ठरलेल्या या सलग चौथ्या सामन्यात शेवटच्या तीन षटकांत चेन्नईला 54 धावांची गरज होती. ऍडम झाम्पाने टाकलेल्या 18 व्या षटकात चेन्नईच्या धोनी व जडेजा यांनी एक षटकार, 1 चौकारांसह 14 धावा वसूल केल्या. 12 चेंडूत 40 अशा स्थितीत होल्डरच्या 19 व्या षटकात 2 षटकार, 1 चौकारांसह त्यांनी एकूण 19 धावा फटकावल्या. त्यामुळे 6 चेंडूत 21 असे समीकरण बनले. संदीप शर्माने टाकलेल्या शेवटच्या षटकात धोनीने सलग 2 षटकार ठोकत विजयाची संधी निर्माण केली. पण अखेरच्या 3 चेंडूवर 7 धावांची गरज असताना जडेजा-धोनी यांना केवळ 3 धावाच करता आल्याने राजस्थानला 3 धावांनी विजय मिळाला.
त्याआधी देव्हॉन कॉनवेने 38 चेंडूत 50 धावा फटकावताना 6 चौकार मारले. 19 चेंडूत 31 धावा फटकावणाऱया रहाणेसमवेत त्याने 43 चेंडूत 68 धावांची भागीदारी केली. शिवम दुबे (8), मोईन अली (7), अम्बाती रायुडू (1) झटपट बाद झाले. धोनी (17 चेंडूत नाबाद 32) व जडेजा (15 चेंडूत नाबाद 25) यांनी सातव्या गडय़ासाठी 30 चेंडूत अभेद्य 59 धावांची भागीदारी करीत प्रयत्नांची शर्थ केली. पण ते चेन्नईचा पराभव टाळू शकले नाहीत. राजस्थानच्या चहल व अश्विन यांनी प्रत्येकी 2, झाम्पा व संदीप शर्मा यांनी एकेक बळी मिळविला.

राजस्थानच्या बटलरचे अर्धशतक
तत्पूर्वी, प्रथम खेळणाऱया राजस्थानने 15 षटकांत 4 बाद 135 धावांची मजल मारली होती. मात्र शेवटच्या पाच षटकांत त्यांना अपेक्षित धावगती राखता न आल्याने ते दोनशेची मजल मारू शकले नाहीत. त्यांनी या 5 षटकांत केवळ 40 धावा जमविताना 4 बळीही गमविले. रवींद्र जडेजाने स्पिनर्सला अनुकूल खेळपट्टीवर अचूक मारा करीत 22 धावांत 2 बळी मिळविले. बटलरने मात्र अशा स्थितीतही 36 चेंडूत 52 धावा फटकावताना 3 उत्तुंग षटकार ठोकले. तुषार देशपांडेने यशस्वी जैस्वालला दुसऱयाच षटकात बाद केले. त्याने 10 धावा केल्यानंतर बटलर व पडिक्कल यांनी दुसऱया गडय़ासाठी 41 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली. बऱयापैकी सूर गवसलेल्या पडिक्कलने 26 चेंडूत 38 धावा फटकावल्या. अखेरच्या टप्प्यात हेतमेयरने फिनिशर म्हणून प्रभावी कामगिरी करताना 18 चेंडूत 30 धावा तडकावल्या तर तुषार देशपांडेने अखेरच्या षटकात केवळ 8 धावा दिल्या.
राजस्थानने धडाक्यात सुरुवात करताना 6 व्या षटकांतच अर्धशतकी मजल मारली. जडेजा व अन्य स्पिनर्सनी त्यांच्या धावगतीला ब्रेक लावल्याने 8 ते 13 षटकांत राजस्थानला धावांसाठी झगडावे लागले. या षटकावेळी तीन चेंडूंच्या फरकाने त्यांनी 2 बळीही गमविले. पडिक्कल व कर्णधार संजू सॅमसन (0) हे झटपट बाद झाले. सुमारे 6 षटकांत राजस्थानच्या फलंदाजांना एकही चौकार नोंदवता आला नाही. मात्र अश्विनने पदार्पणवीर आकाश सिंगला लागोपाठ दोन उत्तुंग षटकार ठोकले. धावगती वाढवण्यासाठी त्याने आणखी एक उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात तो झेलबाद झाला. आकाश सिंगने अश्विन व धुव जुरेल यांचे बळी मिळविले तर तुषार देशपांडेने 2 व मोईन अलीने एक बळी मिळविला.
राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 8 बाद 175 ः जैस्वाल 10 (8 चेंडूत 2 चौकार), बटलर 52 (36 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), देवदत्त पडिक्कल 38 (26 चेंडूत 5 चौकार), सॅमसन 0, आर. अश्विन 30 (22 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), शिमरॉन हेतमेयर नाबाद 30 (18 चेंडूत 2 चौकार, 2 षटकार), ध्रुव जुरेल 4, होल्डर 0, झाम्पा 1, अवांतर 10. , आकाश सिंग 2-40, तुषार देशपांडे 2-37, जडेजा 2-21, मोईन अली 1-21.
चेन्नई सुपरकिंग्स 20 षटकांत 6 बाद 172 ः गायकवाड 8, कॉनवे 50 (38 चेंडूत 6 चौकार), दुबे 8, मोईन अली 7, रायुडू 1, जडेजा नाबाद 25 (15 चेंडूत 1 चौकार, 2 षटकार), धोनी नाबाद 32 (17 चेंडूत 1 चौकार, 3 षटकार), अवांतर 10. आर.अश्विन 2-25, चहल 2-27, झाम्पा 1-43, संदीप शर्मा 1-30, होल्डर 0-37.

हा सामना सुरू होण्याआधी आयपीएलमध्ये 200 व्या सामन्यात नेतृत्व करणाऱया एमएस धोनीचा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांनी त्याला स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी श्रीनिवासन यांच्या पत्नी चित्रा व तामिळनाडू क्रिकेट संघटनेच्या माजी अध्यक्षा रुपा गुरुनाथ उपस्थित होत्या.








