मथिशा पथिराणा सामनावीर : वधेराचे अर्धशतक वाया
वृत्तसंस्था~ चेन्नई
2023 च्या टाटा आयपीएल चषक टी-20 स्पर्धेतील शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या सामन्यात यजमान चेन्नई सुपर किंग्ज्ने मुंबई इंडियन्सचा 14 चेंडू बाकी ठेऊन 6 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या स्पर्धेतील चेन्नईचा मुंबई इंडियन्सवरील हा दुसरा विजय आहे. या सामन्यानंतर स्पर्धेच्या गुणतक्त्यात चेन्नई सुपर किंग्ज् 13 गुणासह दुसऱ्या स्थानावर असून मुंबई इंडियन्स 10 गुणासह सहाव्या स्थानावर आहे. शनिवारच्या सामन्यात मुंबईच्या नेहाल वधेराचे अर्धशतक वाया गेले. चेन्नईतर्फे लंकेच्या पथिराणाने 15 धावात 3 गडी बाद केले. आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघाने आपल्या घरच्या मैदानावर तब्बल 4777 दिवसांनंतर मुंबई इंडियन्सवर हा पहिला विजय नोंदविला आहे.

या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज्ने नाणेफेक जिंकून मुंबई इंडियन्सला प्रथम फलंदाजी दिली. मुंबई इंडियन्सच्या डावाला नेहमीप्रमाणे चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले तीन फलंदाज केवळ 14 धावात तंबूत परतले. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी आपल्या वेगवान गोलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सच्या पहिल्या तीन फलंदाजांना बाद केले. या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा सलामीला फलंदाजीस आला नाही. ग्रीन आणि इशान किसन यांनी मुंबईच्या डावाला सुरुवात करताना 11 चेंडून 13 धावा जमविल्या. तुषार देशपांडेने कॅमेरुन ग्रीनचा 6 धावांवर त्रिफळा उडविला. त्यानंतर दीपक चहरने मुंबईला पाठोपाठ दोन धक्के दिले. त्याने इशान किसनला तिक्ष्णाकरवी झेलबाद केले. इशान किसनने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार रोहित शर्मा केवळ 3 चेंडू खेळू शकला. दीपक चहरच्या गोलंदाजीवर जडेजाने शर्माचा झेल टिपला. शर्माला यावेळीही आपले खाते उघडता आले नाही. नेहाल वधेरा आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरताना चौथ्या गड्यासाठी 55 धावांची भागिदारी केली. जडेजाच्या चेंडूवर सूर्यकुमार यादवचा त्रिफळा उडाला. त्याने 22 चेंडूत 3 चौकारांसह 26 धावा जमविल्या. सूर्यकुमार तंबूत परतल्यानंतर वधेराला स्टब्जकडून बऱ्यापैकी साथ मिळाली. या जोडीने पाचव्या गड्यासाठी 7 षटकात 54 धावांची भागिदारी केली. लंकेच्या पतिरानाने वधेराला त्रिफळाचीत केले. त्याने 51 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 64 धावा झळकाविल्या. टिम डेव्हिड अधिक वेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. तुषार देशपांडेने डेव्हिडला 2 धावांवर झेलबाद केले. पतिरानाने अर्शद खानला केवळ एका धावेवर तंबूत धाडले. तो शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पथिराणाने आपल्या या षटकातील चौथ्या चेंडूवर स्टब्जला झेलबाद केले. त्याने 21 चेंडूत 2 चौकारांसह 20 धावा केल्या. आर्चर 3 तर चावला 2 धावावर नाबाद राहिले. मुंबई संघाला अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. मुंबईच्या डावात 1 षटकार आणि 15 चौकार नोंदविले गेले. चेन्नईतर्फे पतिरानाने 15 धावात 3 तर देशपांडे आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी 2 तसेच जडेजाने 1 गडी बाद केला. मुंबई इंडियन्सने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 34 धावा जमविताना 3 गडी गमविले. मुंबई इंडियन्सचे पहिले अर्धशतक 45 चेंडूत फलकावर लागले. मुंबई इंडियन्सचे शतक 92 चेंडूत नोंदविले गेले.

प्रत्युत्तरादाखल खेळताना चेन्नई संघाने 17.4 षटकात 4 बाद 140 धावा जमवित हा सामना 6 गड्यांनी जिंकला. गायकवाड आणि कॉनवे या सलामीच्या जोडीने 25 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. पाचव्या षटकात चावलाने गायकवाडला झेलबाद केले. त्याने 16 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावा झळकविल्या. कॉनवे आणि अजिंक्य रहाणे या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 29 चेंडूत 35 धावा झोडपल्या. चावलाच्या गोलंदाजीवर रहाणे पायचीत झाला. त्याने 17 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 21 धावा जमविल्या. स्टब्जने अंबाती रायडूला गोयलकरवी झेलबाद केले. रायडूने 11 चेंडूत 1 षटकारासह 12 धावा जमविल्या. कॉनवेने 42 चेंडूत 4 चौकारांसह 44 धावा जमविल्या आणि तो डावातील 17 व्या षटकात मधवालच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. शिवम दुबे आणि कर्णधार धोनी यांनी विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. दुबेने 18 चेंडूत 3 षटकारांसह नाबाद 26 तर धोनीने नाबाद 2 धावा केल्या. चेन्नईच्या डावात अवांतराच्या रुपात 5 धावा मिळाल्या. चेन्नई संघातर्फे 7 षटकार आणि 9 चौकार नोंदविले गेले. मुंबई इंडियन्सतर्फे चावलाने 25 धावात 2 तर मधवाल आणि स्टब्ज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. चेन्नईने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 55 धावा जमविताना 1 गडी गमविला. चेन्नईचे पहिले अर्धशतक 31 चेंडूत तर शतक 77 चेंडूत फलकावर लागले.
संक्षिप्त धावफलक – मुंबई इंडियन्स : 20 षटकात 8 बाद 139 (ग्रीन 6, इशान किसन 7, रोहित शर्मा 0, वधेरा 51 चेंडूत 64, सूर्यकुमार यादव 22 चेंडूत 26, स्टब्ज 21 चेंडूत 20, डेव्हिड 2, अर्शद खान 1, आर्चर नाबाद 3, चावला नाबाद 2, अवांतर 8, पथिराणा 3-15, दीपक चहर 2-18, तुषार देशपांडे 2-26, जडेजा 1-37), चेन्नई सुपर किंग्ज् : 17.4 षटकात 4 बाद 140 (गायकवाड 16 चेंडूत 30, कॉनवे 42 चेंडूत 44, रहाणे 17 चेंडूत 21, रायडू 11 चेंडूत 12, दुबे 18 चेंडूत नाबाद 26, धोनी नाबाद 2, अवांतर 5, चावला 2-25, स्टब्ज 1-14, मधवाल 1-4).









