आयपीएल 16 :प्लेऑफचे तिकीट मिळवणारा दुसरा संघ : सामनावीर ऋतुराज गायकवाड, कॉनवेची शानदार अर्धशतके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या आयपीएलमधील सामन्यात चेन्नईने दिल्लीचा 77 धावांनी पराभव करत प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. ऋतुराज गायकवाड आणि डेवेन कॉनवे यांच्या वादळी अर्धशतकानंतर गोलंदाजांनी आपली कामगिरी चोख बजावली. चेन्नईने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबदल्यात 146 धावांपर्यंत मजल मारु शकला. दिल्लीची यंदाच्या हंगामातील सुरुवात आणि शेवटही निराशाजनक झाला.
दिल्लीविरुद्ध विजय मिळवत चेन्नईने 14 सामन्यात 17 गुणांची कमाई केली आहे. प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारा चेन्नई दुसरा संघ आहे. याआधी गुजरातने प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. चेन्नई सध्या दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. पण लखनौ आणि कोलकाता यांच्यातील सामन्यावर चेन्नईने दुसरे स्थान अवलंबून आहे. लखनौने कोलकात्याचा विराट पराभव केल्यास चेन्नई तिसऱ्या क्रमांकावर घसरु शकतो. अशात लखनौ आणि केकेआर यांच्यामध्ये क्वालिफायर एक सामना होईल. तसेच लखनौने केकेआरचा पराभव केल्यास चेन्नई आणि लखनौ यांच्यात समान गुण होतील. अशात नेट रनरेटच्या आधारावर दोनपैकी एका संघाला क्वालिफायर एक मध्ये प्रवेश मिळेल.
वॉर्नरची एकाकी झुंज अपयशी
चेन्नईने दिलेल्या 224 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात निराशाजनक झाली. पृथ्वी शॉ स्वस्तात तंबूत परतला. पृथ्वी शॉ याने फक्त पाच धावांचे योगदान दिले. पृथ्वी शॉ बाद झाल्यानंतर साल्ट आणि रुसोही लगेच तंबूत परतले. दीपक चाहर याने या दोघांना एकापाठोपाठ एक तंबूत धाडले. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार डेविड वॉर्नरने एक बाजू लावून धरली होती. वॉर्नरने 86 धावांची एकाकी झुंज दिली. साल्ट 3, रुसो 0 धावांवर बाद झाले. यश धुल 13 आणि अक्षर पटेल याने 15 धावांचे योगदान दिले. अमन खान सात तर ललीत यादव सहा धावांवर बाद झाले. कुलदीप यादव शून्यावर बाद झाला. डेविड वॉर्नरचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला 30 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. वॉर्नरने एकाकी देताना 58 चेंडूत 86 धावांचे योगदान दिले. या खेळीत वॉर्नर याने पाच षटकार आणि सात चौकार लावले. वॉर्नर बाद झाल्यानंतर दिल्लीला इतर तळाच्या फलंदाजांनीही निराशा केल्यामुळे 9 बाद 146 धावा करता आल्या.
ऋतुराज-कॉनवेची शानदार अर्धशतके
प्रारंभी, नाणेफेक जिंकून चेन्नईने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऋतुराज गायकवाड आणि देवॉन कॉनवे यांनी 141 धावांची दमदार सलामी दिली. गायकवाडने 50 चेंडूत 3 चौकार व 7 षटकारासह 79 धावांची वादळी खेळी केली. साकरियाने ऋतुराजला बाद करत ही जोडी फोडली. कॉनवेने 3 षटकार आणि 11 चौकारांच्या मदतीने 52 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. कॉनवे आणि गायकवाड या दोघांनीही दिल्लीच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. ऋतुराज बाद झाल्यानंतर शिवम दुबेने वादळी फलंदाजी केली. दुबेशिवाय जडेजा आणि धोनी यांनीही अखेरच्या दोन षटकात चेन्नईची धावसंख्या वाढवली. शिवम दुबे याने 9 चेंडूत 3 षटकारांच्या मदतीने 22 धावांचे योगदान दिले. जडेजा आणि धोनीने चेन्नईची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. जडेजाने अवघ्या 7 चेंडूत 20 धावांची छोटेखानी खेळी केली. धोनीने नाबाद 5 फटकावल्या. यामुळे चेन्नईने निर्धारित 20 षटकांत 3 बाद 223 धावा केल्या.
संक्षिप्त धावफलक :
चेन्नई सुपर किंग्स : 20 षटकांत 3 बाद 223 (ऋतुराज गायकवाड 50 चेंडूत 79, देवॉन कॉनव्हे 52 चेंडूत 87, शिवम दुबे 9 चेंडूत 22, धोनी नाबाद 5, जडेजा 7 चेंडूत नाबाद 20, खलील अहमद, नोर्तजे, साकरिया प्रत्येकी एक बळी)
दिल्ली कॅपिटल्स 20 षटकांत 9 बाद 146 (पृथ्वी शॉ 5, डेविड वॉर्नर 58 चेंडूत 86, यश धुल 13, अक्षर पटेल 15, दीपक चहर 22 धावांत 3 बळी, पथिराणा व तीक्षणा प्रत्येकी 2 बळी, तुषार देशपांडे, जडेजा प्रत्येकी एक बळी).
धोनीसाठी दिल्लीकर रस्त्यावर
धोनीचे जगभरात चाहते आहे. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहते जिवाचे रान करतात… हे अनेकदा पाहायलाही मिळाले. चेन्नईचा अखेरचा साखळी सामना दिल्लीत होता. या सामन्यासाठी धोनी दिल्लीत आला होता. धोनीला पाहण्यासाठी स्टेडियमवर तुफान गर्दी झाली होती. पण चाहत्यांनी चक्क धोनीच्या बसला गराडा घातला होता. मैदानावर सामना खेळण्यासाठी धोनी बसमधून निघाला होता. यावेळी अचानक चेन्नईच्या बसला चाहत्यांनी गरडा घातला. धोनी धोनीच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता. धोनीसाठी दिल्लीकर रस्त्यावर उतरले होते. ट्रॅफिक जॅम झाले होते. प्रत्येक चाहत्याने धोनीच्या सात क्रमांकाची जर्सी घातली होती. धोनीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.