क्रूझ पर्यटक हंगामाला अधिकृतरीत्या प्रारंभ
प्रतिनिधी /वास्को
कॉर्डिला इम्प्रेस हे आंतरराष्ट्रीय फिरतीवरील पर्यटक जहाज काल शुक्रवारी सकाळी सुमारे आठशे पर्यटकांसह मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजाच्या आगमनाने गोव्याच्या प्रुझ पर्यटन हंगामाला अधिकृतरीत्या प्रारंभ झाला आहे. या जहाजाचे एमपीएचे अध्यक्ष वेंकट रमण्णा, उपाध्यक्ष गुरूप्रसाद राय तसेच इतर अधिकाऱयांनी धक्क्यावर स्वागत केले.
कोविड काळामुळे गोव्यातील क्रूझ पर्यटनाला दोन वर्षे फटका बसला होता. मागच्या वर्षी मोजकीच काही जहाजे मुरगाव बंदरात दाखल झाली होती. यंदा कोविडची भिती ओसरलेली असल्याने पर्यटन हंगाम नव्या दमाने सुरू झालेला आहे. येत्या एप्रीलपर्यंत 51 देशी विदेशी क्रूझ पर्यटक जहाजे गोव्यात येणार आहेत. त्यापैकी पहिले जहाज शुक्रवारी सकाळी मुरगाव बंदरात दाखल झाले. या जहाजात सुमारे 800 पर्यटक होते. पैकी चारशे पर्यटकांनी दिवसभरात गोव्यात भ्रमंती केली. संध्याकाळी हे जहाज मुंबईकडे रवाना झाले.
मुरगाव बंदरात टॅक्सी काऊन्टरचे उद्घाटन
दरम्यान, मुरगाव बंदरात दाखल होणाऱया पर्यटकांच्या सोयीसाठी तसेच पर्यटक टॅक्सी व्यवसायीकांच्या सोयीसाठी क्रूझ पर्यटक जहाजांच्या धक्क्याबाहेर मुरगावचा राजा संघटनेने नवीन टॅक्सी काऊंटर सुविधा सुरू केली आहे. या सेवेचे उद्घाटन स्थानिक आमदार संकल्प आमोणकर व जहाजातून उतरलेल्या पर्यटकांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. आमदार संकल्प आमोणकर व पर्यटकांनी टॅक्सी व्यवसायीकांना नवीन पर्यटन हंगामासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.