51 क्रूझ पर्यटक जहाजे मुरगाव बंदरात दाखल होणार, वर्षभरात क्रूझ पर्यटकांसाठी स्वातंत्र जेटी
प्रतिनिधी /वास्को
मुरगाव बंदरात 74 कोटी खर्चून पर्यटक जहाजांसाठी नवीन जेटी बांधण्यात येत असून या जेटीचे काम पुढील वर्षभरात पूर्ण होणार असल्याचे एमपीएचे अध्यक्ष वेंकट रामण्णा अक्काराजू यांनी म्हटले आहे. ही जेटी समुद्राच्या 55 हजार चौ.मि. क्षेत्रात उभारण्यात येत आहे. ही जेटी पूर्ण होईपर्यंत विद्यमान जेटीवरच पर्यटक जहाजांचे आगमन होणार असून यंदाच्या पर्यटन हंगामात 51 देशी व विदेशी पर्यटक जहाजे गोव्यात दाखल होणार असल्याचे व पहिले जहाज येत्या 30 रोजी बंदरात दाखल होईल असे एमपीएच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.
एमपीएचे अध्यक्ष वेंकट रामण्णा अक्काराजू यांनी आपल्या इतर अधिकाऱयांच्या तसेच क्रूझ पर्यटन क्षेत्राशी निगडीत सर्व संबंधितांच्या उपस्थितीत शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत यंदाच्या क्रूझ पर्यटनाच्या तयारी विषयी माहिती दिली. अध्यक्ष म्हणाले की, यंदाच्या क्रूझ पर्यटन हंगामातील पहिले जहाज 28 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान मुरगाव बंदरात दाखल होईल. पहिले जहाज देशी असेल तर ऑक्टोबरमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटक जहात दाखल होईल. एप्रिल 2023 पर्यंत ही जहाजे गोव्यात येतील. यंदाच्या हंगामात देशी व आंतरराष्ट्रीय जहाजे मिळून एकूण 51 क्रूझ जहाजे गोव्यात येतील. यात 30 देशांतर्गंत पर्यटक जहाजे तर 21 आंतरराष्ट्रीय पर्यटक जहाजांचा समावेश आहे अशी माहिती त्यांनी दिली. या जहाजांच्या स्वागतासाठी सर्व सज्जता एमपीएने ठेवलेली आहे. विविध सोयीसुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. मागची दोन वर्षे कोविड काळात क्रूझ पर्यटन ठप्प झाले होते. मात्र, आता पुन्हा सुरवात होत आहे. याचा लाभ गोव्याच्या पर्यटन क्षेत्राला आणि गोव्याच्या अर्थव्यवस्थेला होईल असे एमपीएच्या अध्यक्षांनी सांगितले.
वर्षभरात 74 कोटी खर्चून बंदरात क्रूझ पर्यटक जेटी
देशात क्रूझ पर्यटनाला भरपूर संधी असून गोव्यातही अधिक प्रमाणात क्रूझ पर्यटक येत आहेत. या पर्यटनाचा एमपीएला फारसा लाभ होत नाही. गोव्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी यावी, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात म्हणून केंद्र सरकारच्या धोरणानुसार बंदरात क्रूझ पर्यटनाला संधी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे अध्यक्षांनी सांगितले. यंदाचे पहिले क्रूझ पर्यटन जहाज मुरगाव बंदरात दाखल झाल्यावर गोवा व भारतीय संस्कृतीचे दर्शन कलाकृतींच्या माध्यमातून सादर करून पर्यटकांचे स्वागत करण्यात येईल असे अध्यक्ष म्हणाले. यावेळी त्यांनी मुरगाव बंदरातील काही धक्क्यांच्या विकासाचीही माहिती दिली. बंदराच्या विकासाद्वारे स्थानिकांसाठी रोजगार संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून खासगीकरणाद्वारे बंदरातील धक्क्यांचा विकास करण्यात येईल. क्रूझ पर्यटक जहाजांसाठी नवी स्वातंत्र जेटी 55 हजार चौ. मिटर क्षेत्रात उभारण्यात येत असून हे काम येत्या सप्टेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या जेटीसाठी 74 कोटी रूपये खर्च करण्यात येत आहेत असे एमपीएचे अध्यक्ष रामण्णा म्हणाले.









