वृत्तसंस्था / उदयपूर
10 दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कथितरित्या पोस्ट अपलोड करणाऱया एका व्यक्तीची राजस्थानच्या उदयपूरमध्ये निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रत्यक्षात संबंधित इसमाच्या 8 वर्षीय मुलाने सोशल मीडियावर चुकून ही पोस्ट केल्याचे समोर आले होते. हल्लेखोर मंगळवारी भरदिवसा संबंधित व्यक्तीच्या दुकानात घुसले आणि त्यांनी तलवारीने अनेक वार करत गळा चिरला आहे. तसेच या हत्येच्या कृत्याची चित्रफित देखील तयार करत ती सोशल मीडियावर अपलोड करत हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे. हा प्रकार तालिबानच्या क्रौर्यासारखाच असल्याने देशभरातून संताप व्यक्त होतोय. या घटनेनंतर उदयपूर जिल्हय़ामध्ये शांतता-सुव्यवस्था राखण्यासाठी 24 तासांकरता इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर हत्येच्या घटनेच्या विरोधात अनेक बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या. तर मृताच्या कुटुंबीयांनी सरकारकडून 50 लाख रुपयांची मदत तसेच शासकीय नोकरीची मागणी केली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शांततेचे आवाहन केले आहे. तर भाजपने या घटनेसाठी काँग्रेस सरकारचे तुष्टीकरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे.
कन्हैयालाल तेली (40 वर्षे) चे शहरात सुप्रीम टेलर्स नावाने दुकान आहे. मंगळवारी दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास बाइकवरून दोघेजण त्याच्या दुकानात आले. कन्हैयालाल यांना काही समजण्यापूर्वीच दोन्ही आरोपींनी त्याच्यावर तलवारीने अनेक वार केले. या हल्ल्यामुळे कन्हैयालाल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेतली. तर विरोधी पक्षनेते गुलाबचंद कटारिया यांनी पोलीस अधीक्षकांना फोन करून घटनेची माहिती घेतली. निष्पक्ष तपासाची मागणी करत त्यांनी आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे असे पोलीस अधीक्षकांना सांगितले आहे.
कन्हैयालाल यांनी 10 दिवसांपूर्वी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट अपलोड केली होती. तेव्हापासून एका विशिष्ट समुदायाचे लोक त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. धमक्या मिळू लागल्याने कन्हैयालाल यांनी 6 दिवस दुकान उघडले नव्हते. तसेच धमक्यांच्या विरोधात तक्रारही नोंदविली होती. परंतु पोलिसांनी याप्रकरणी गांभीर्य दाखविले नव्हते.
मोठा बंदोबस्त
हत्येच्या घटनेची माहिती कळताच जिल्हाधिकारी ताराचंद मीणा, पोलीस अधीक्षक मनोज चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृताच्या कुटुंबीयांना या घटनेसाठी प्रशासनालाच जबाबदार धरले आहे. तर प्रशासनाने खबरदारीदाखल नजीकच्या जिल्हय़ातून अतिरिक्त पोलीस दल मागविले आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी या घटनेच्या विरोधात निदर्शने केल्याचे समजते.









