एप्रिल ते सप्टेंबरमधील आकडेवारीचा समावेश : स्टीलमिंट इंडियाची माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आर्थिक वर्ष 2023-24 च्या एप्रिल-सप्टेंबर या कालावधीत भारताचे कच्च्या पोलादाचे उत्पादन 14.7 टक्क्यांनी वाढून 6.965 दशलक्ष टन झाले आहे, अशी माहिती स्टीलमिंट इंडियाने दिली.
गेल्या वर्षी याच कालावधीत स्टीलचे उत्पादन 6.106 कोटी टन होते. सध्याच्या घडीला प्रमुख भारतीय पोलाद कंपन्यांची क्षमता वाढवण्यावरच अधिकतर भर दिसून आली.
दुसऱ्या सहामाहीत उत्पादन वाढेल
स्टीलमिंटच्या मते, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत उत्पादन वाढीला वाव असणार आहे. तयार पोलादाचा देशांतर्गत वापरही 14.77 टक्क्यांनी वाढून 6.399 कोटी टन झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत 5.575 कोटी टन इतका होता. दरम्यान, देशाची निर्यात एप्रिल-सप्टेंबर 2022-23 मध्ये 36 लाख टनांवरून 10.25 टक्क्यांनी घसरून 32.3 लाख टन झाली आहे.
या कंपन्यांचे उत्पादन
वार्षिक आधारावर निर्यात मात्र 13.33 टक्क्यांनी वाढून 25.6 लाख टनांवरून 29 लाख टन झाली आहे. टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, जिंदाल स्टील आणि पॉवर(जेएसपी), एएमएनएस इंडिया, सेल आणि आरआयएनएल या सहा कंपन्यांचे एकत्रित उत्पादन 4.124 कोटी टन राहिले, जे मागील वर्षीच्या याच कालावधीत 3.83 कोटी टन होते.









