वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रशिया आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढत असल्यामुळे तेलाच्या जागतिक पुरवठ्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. परिणामत: येत्या काही महिन्यांमध्ये कच्च्या तेलाच्या दरात वाढ होऊन ते 80 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोहोचू शकते. जागतिक पातळीवर भू-राजकीय जोखीम वाढल्याने तेलाच्या दरांवर दबाव वाढू शकतो. कच्च्या तेलाचे दर ऑक्टोबर दरम्यान 72.07 डॉलरवरुन 76 डॉलरवर पोहोचू शकतात. तसेच 2025 च्या शेवटी हे दर 80-82 डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाला यूक्रेन सोबतचे युद्ध थांबवण्यासाठी 10-12 दिवसांचा वेळ दिला आहे. जर रशियाने युद्ध थांबवले नाही तर रशियासोबत व्यापार करणाऱ्या देशांवर अमेरिका अतिरिक्त निर्बंध लादणार असून 100 टक्के दुय्यम टॅरिफ लादणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे तेलाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेमुळे रशियाकडून क्रूड ऑईल खरेदी करणाऱ्या देशांसमोर अडचणी निर्माण होऊ शकतात.









