रत्नागिरी :
प्रस्तावित वाटद एमआयडीसी प्रकल्पाला आता स्थानिक ग्रामस्थांचा जोरदार पाठिंबा मिळत आहे. या प्रकल्पाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या ग्रामस्थांनी शनिवार 26 जुलै रोजी एक विशेष आणि महत्वपूर्ण बैठक आयोजित केली आहे. ही बैठक वाटद एमआयडीसीच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची मानली जात आहे. कारण यामुळे या प्रकल्पाबाबत स्थानिक पातळीवरील जनमताचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
या बैठकीसाठी पालकमंत्री उदय सामंत यांची उपस्थिती लाभणार आहे. यापूर्वी एमआयडीसीला विरोध करणाऱ्या गटाला या पाठिंब्याद्वारे प्रत्युत्तर देण्याचा निर्धार ग्रामस्थांनी केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे एमआयडीसी प्रस्तावित असून यासाठीची भूसंपादन प्रक्रिया सध्या सुरू आहे. या प्रक्रियेंतर्गत सर्वेक्षण आणि हरकतींवर सुनावण्या घेण्यात आल्यानंतर काही मोजक्या ग्रामस्थांनी या एमआयडीसीला विरोध करत वाटद-खंडाळा परिसरात मोर्चा काढला होता. मात्र, वाटद एमआयडीसीला पाठिंबा देणाऱ्या ग्रामस्थांची संख्या मोठी असल्याने त्यांनी आता एकत्रितपणे आपली भूमिका मांडण्याचे ठरवले आहे. या बैठकीत वाटद एमआयडीसीमुळे परिसरातील रोजगार निर्मिती, स्थानिक व्यवसायांना मिळणारी चालना व एकूणच जिह्याच्या विकासाला कशी गती मिळेल, यावर सविस्तर चर्चा होणार आहे.








