केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय यांचे प्रतिपादन : सीआरपीएफच्या निष्पक्षता, राष्ट्रीयता, सेवा-निष्ठेचे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांकडून कौतुक
बेळगाव : केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) हे निष्पक्षता, राष्ट्रीयता, सेवा आणि निष्ठेचे प्रतीक आहे. सीआरपीएफ दलाशिवाय देशात कोठेही निवडणुका घेणे अशक्य आहे. जेव्हा जेव्हा राज्यांना केंद्रीय दलांची आवश्यकता भासते तेव्हा त्यांची पहिली पसंती नेहमीच सीआरपीएफला असते. देशातील नागरिकांना शांतपणे झोपता येत असेल तर त्याचे श्रेय सीआरपीएफच्या भूमिकेला जाते. नक्षलवाद निर्मूलनात सीआरपीएफच्या विशेष युनिट ‘कोब्रा’ने दिलेल्या प्रशंसनीय भूमिकेबद्दल केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय यांनी कौतुक केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वर्षी मार्चपर्यंत नक्षलवाद पूर्णपणे नष्ट होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना सीआरपीएफच्या कोब्रा स्कूल ऑफ जंगल वॉरफेअर अँड टॅक्टिक्स (सीएसजेडब्ल्यूटी) येथे 180 जवानांसाठी नव्याने बांधलेल्या प्रशिक्षण आणि एव्ही हॉल इमारत, सबऑर्डिनेट ऑफिसर्स मेस इमारत आणि बॅरेक्सचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, सीआरपीएफ दक्षिण झोनचे एडीजी रविदीप साही, के. के. सेक्टर आयजी डॉ. विपुलकुमार, डीआयजी सुभाष चंद्रा, जिल्हाधिकारी, सीईओ, डीएफओ यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री बंडी संजय म्हणाले, 36 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन सुविधांचे उद्घाटन करणे खूप आनंदाची बाब आहे. आधुनिक पायाभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारती सीएसजेडब्ल्यूटीच्या प्रशिक्षण प्रणालीला नवीन दिशा देते. यामध्ये अत्याधुनिक सभागृह, सेमिनार हॉल, वर्गखोल्या, ऑडिओ-व्हिज्युअल रुम, सँड मॉडेल रुम, आयईडी मॉडेल रुम आणि इतर प्रशिक्षणाशी संबंधित सुविधा आहेत. सीआरपीएफ हा देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा कणा आहे. दहशतवाद अंतर्गत सुरक्षा किंवा नैसर्गिक आपत्ती असो आपले सैनिक प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी नेहमीच तयार असतात. म्हणूनच त्यांना सतत आधुनिक प्रशिक्षण, ज्ञान, सुविधा आणि तत्परता प्रदान करणे खूप महत्त्वाचे आहे. आज देशवासिय शांतपणे झोपू शकतात. निवडणुकांच्या काळात सीआरपीएफची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. सीआरपीएफशिवाय आता निवडणुका पार पडणे जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच जेव्हा राज्ये केंद्रीय सैन्याची मागणी करतात, तेव्हा सीआरपीएलला प्रथम प्राधान्य दिले जाते.
ज्या भागात एकेकाळी नक्षलवाद्यांचा प्रभाव होता, त्या भागात आज त्यामध्ये लक्षणीय घट झाली आहे. यामागे सीआरपीएलच्या कोब्रा युनिटची भूमिका अत्यंत कौतुकास्पद आहे. कोब्रा आणि इतर दलांच्या प्रयत्नांमुळे जी गावे एकेकाळी नक्षलवादाच्या विळख्यात होती ती गावे आज विकासाकडे वाटचाल करीत आहेत. नक्षलवादाच्या पूर्णपणे उच्चाटनाचा दिवस दूर नाही. त्या यशात सीआरपीएफ निर्णायक भूमिका बजावेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार लवकरच नक्षलवाद पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी वचनबद्ध आहे, असे ते म्हणाले. मोदी सरकार राष्ट्रासाठी आपले जीवन, संघर्ष आणि बलिदान अर्पण करणाऱ्या सैनिकांच्या कल्याणासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. त्याचबरोबर त्यांनी सर्वांनी आपल्या हृदयात राष्ट्र प्रथम शपथ घेऊन सेवा करण्याचे आवाहन केले.









