एनआयएची कार्यवाही, 15 दिवसांची कोठडी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका साहाय्यक पोलीस निरीक्षक पदावरील सैनिकाला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. त्याला न्यायालयाने 15 दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे. 21 मे यादिवशी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) त्याला अटक केली होती.
मोतीराम जाट असे त्याचे नाव आहे. तो 2023 पासून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होता, हे उघड झाले आहे. सीआरपीएफच्या हालचालींची गुप्त माहिती त्याच्याकडून पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना दिली जात होती. या कामासाठी त्याला पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात पैसाही मिळत होता. हा पैसा त्याला विविध हस्तकांच्या माध्यमातून दिला जात होता. गुप्त माहिती पाकिस्तानला पाठविण्यासाठी तो गुप्त संपर्क यंत्रणेचा उपयोग करीत होता. त्यामुळे त्याचे कारनामे लवकर उघड झाले नाहीत. तथापि, आता त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह किती हस्तक आहेत, याची माहिती घेतली जात आहे. त्याच्या अटकेमुळे एका मोठ्या हेरगिरी जाळ्याचा भांडाफोड झाल्याची माहिती देण्यात आली. दिल्लीच्या पतियाळा हाऊस न्यायालयाने त्याला कोठडी दिली आहे.
सोशल मीडियाचे सहकार्य
सोशल मीडियावरील काही वेबसाईटस्च्या सहकार्याने त्याचा पर्दाफाश झाला आहे. त्याला सीआरपीएफचा सोशल मीडिया कक्ष आणि केंद्र सरकारच्या विविध गुप्तचर यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अटक करण्यात यश आले आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. तो नेमकी कोणती माहिती पाकिस्तानला पाठवित होता, यासंबंधी सखोल चौकशी केली जात आहे. तसेच त्याचे भारतातील कोणाशी कसे संबंध आहेत, याचीही तपासणी केली जात आहे, असे स्पष्ट करण्यात आले.
आतापर्यंत 18 अटकेत
पाकिस्तानने भारतभर आपल्या गुप्तहेरांचे जाळे निर्माण करण्याचा प्रयत्न चालविला आहे. युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यानंतर बऱ्याच देशद्रोह्यांचा पर्दाफाश झाला आहे. देशाच्या विविध भागांमधून आतापर्यंत 18 संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी केली जात आहे. या प्रकरणांमध्ये पाकिस्तानच्या भारतातील दूतावासातील दोन अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.









