सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग केल्याचा आरोप : पूर्वकल्पना न देता विदेश दौरे करत असल्याची तक्रार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
सीआरपीएफने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अनशेड्यूल्ड विदेश दौऱ्यांवर आक्षेप घेतला आहे. सुरक्षा प्रोटोकॉलचा भंग केल्याप्रकरणी सीआरपीएफने राहुल गांधी यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र सीआरपीएफच्या व्हीव्हीआयपी सुरक्षा प्रमुखाने जारी केले असून याची प्रत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनाही पाठविण्यात आली आहे. सुरक्षा मापदंडांचे राहुल गांधी सातत्याने पालन करत नसल्याचे या पत्रात म्हटले गेले आहे. राहुल गांधी सुरक्षेचा मुद्दा गांभीर्याने घेत नसल्याचे म्हणत व्हीव्हीआयपी सुरक्षाप्रमुखाने त्यांच्या सुरक्षेबद्दलच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राहुल गांधी यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा मिळाली असून यात एएसएल (अॅडव्हान्स सिक्युरिटी लायसन) कव्हरही सामील आहे. ही देशातील सर्वाधिक सुरक्षा श्रेणींपैकी एक असून यात सीआरपीएफचे जवान सदैव सुरक्षेत तैनात असतात.
येलो बुक प्रोटोकॉलचे उल्लंघन
राहुल गांधी हे सुरक्षेला गांभीर्याने घेत नाहीत आणि अनेकदा सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करतात. गांधींनी सीआरपीएफच्या सुरक्षेच्या ‘येलो बुक प्रोटोकॉल’चे उल्लंघन करत पूर्वसूचना न देता विदेश दौरे केले आहेत. हा प्रोटोकॉल व्हीव्हीआयपी सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो आणि याचे पालन करणे सुरक्षा यंत्रणांसाठी अनिवार्य असते. झेड प्लस एएसएल सुरक्षाप्राप्त व्हीआयपीने विदेश दौऱ्याच्या कमीतकमी 15 दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणेला कळविणे आवश्यक असते. राहुल गांधी देशाच्या अशा निवडक व्हीव्हीआयपीपैकी एक आहेत, जे अतिसंवेदनशील महत्त्व राखून आहेत, तरीही ते सुरक्षा प्रोटाकॉलचे पालन करत नसल्याची तक्रार सीआरपीएफने केली आहे.
9 महिन्यांमध्ये 6 विदेश दौरे
मागील 9 महिन्यांमध्ये राहुल गांधी हे 6 वेळा विदेशात गेले असून प्रत्येकवेळी सुरक्षा प्रोटोकॉलचे त्यांनी उल्लंघन केले आहे. यातील कुठल्याही विदेश दौऱ्याची पूर्वकल्पना सीआरपीएफला देण्यात आली नव्हती. सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन न करण्यात आल्यास राहुल गांधींच्या सुरक्षेला धोका वाढू शकतो. राहुल गांधींकडून सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करण्यात यावे असे सीआरपीएफने काँग्रेस नेतृत्वाला पत्राद्वारे सांगितले आहे.
6 विदेश दौऱ्यांमध्ये उल्लंघन
- 30 डिसेंबर ते 9 जानेवारी 2025 : इटली दौरा (10-11 दिवस)
- 12 मार्च ते 17 मार्च : व्हिएतनाम दौरा
- 17 एप्रिल ते 23 एप्रिल : दुबई दौरा
- 11 जून ते 18 जून : कतार दोहाचा दौरा
- 25 जून ते 6 जुलै : लंडन दौरा
- 4 सप्टेंबर ते 8 सप्टेंबर : मलेशिया दौरा









