वृत्तसंस्था/ सुकमा
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात शनिवारी सकाळी सीआरपीएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. सुकमामधील चिंतागुफा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिन्ना केडवाल जंगलात सुरक्षा दल गस्तीवर निघाले असताना त्यांना नक्षलींचा मागमूस लागला. सुरक्षा दलाचा माग लागताच नक्षलींनी गोळीबार केल्यानंतर सीआरपीएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली. जवानांकडे मोठा फौजफाटा असल्याचे पाहून नक्षलींनी जंगलभागात पोबारा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
नक्षलवाद्यांनी 28 जुलैपासून शहीद सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, सुरक्षा दलांनी नक्षलग्रस्त भागात नक्षलवाद्यांच्या नापाक मनसुब्यांविरोधात शोधमोहीम व गस्त तीव्र केली आहे. या विशेष गस्त मोहिमेवेळीच शनिवारी सकाळी 10 वाजता चकमक झाल्याचे सांगण्यात येत आहे.