केवळ 15 दिवसांसाठी अनुमती : जुलै 2024 मध्ये ऑनलाईन निकाह
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरमध्ये तैनात असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानाने एका पाकिस्तानी मुलीशी जुलै 2024 मध्ये ऑनलाईन निकाह केला होता. मात्र, व्हिसाच्या कारणांमुळे सदर सैनिक आणि त्याचे कुटुंब पाकिस्तानला जाऊ शकले नव्हते. आता सर्व कायदेशीर प्रोटोकॉल पूर्ण केल्यानंतरच सुनेला भारतात आणण्यात आले आहे. सर्व एजन्सींच्या परवानगीनंतरच हे घडले आहे, असे जवानाच्या कुटुंबियांनी सांगितले. निकाह झाल्यानंतर आता 9 महिन्यांनी त्या सैनिकाची पत्नी भारतात आपल्या सासरच्या घरी आली. पण तिला फक्त 15 दिवसांसाठी परवाना मिळाला आहे.
1 मार्च रोजी जवानाची पत्नी वाघा सीमेवरून जम्मू काश्मीरमधील हंडवाल गावात पोहोचली. मुनीर अहमद याचा निकाह जुलै 2024 मध्ये पाकिस्तानातील सियालकोटमधील कोटली फकीर चांद येथे राहणाऱ्या मेनल हिच्याशी झाला होता. मुनीर अहमद हा जम्मू काश्मीरमधील भालवालमधील राब्ता तहसीलजवळील हंडवाल गावचा रहिवासी आहे. सध्या तो रियासी जिह्यातील शिव खोरी रानसू येथे सीआरपीएफच्या 72 व्या बटालियनमध्ये तैनात आहे.









