खासदार जगदीश शेट्टर, डॉ. किरण ठाकुर यांची उपस्थिती : गायिका श्रेया यांच्या सुमधूर गीतांचा रसिकांनी लुटला मनमुराद आनंद
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगाव आयोजित अन्नोत्सवमध्ये रविवारी गर्दीचा उच्चांक दिसून आला. बेळगावसह चंदगड, खानापूर, संकेश्वर येथील हजारो खाद्यप्रेमींनी उपस्थिती लावल्याने अन्नोत्सवाला प्रचंड गर्दी झाली होती. मागील वर्षाच्या तुलनेत यावषी खाद्यप्रेमींची संख्या वाढल्याने स्टॉलधारकांनी समाधान व्यक्त केले. चटपटीत व चमचमीत खाद्यपदार्थांसाठी ओळखल्या जाणाऱ्या रोटरी अन्नोत्सवाला आठवडाभरापासून सुऊवात झाली आहे. आता अवघे दोन दिवस शिल्लक राहिल्याने खवय्यांची संख्या वाढू लागली आहे. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्यामुळे गर्दीचा महापूर लोटला होता. गुलाबी थंडीमध्ये सुमधूर संगीताचा आस्वाद घेत खवय्यांनी खाद्यपदार्थांवर ताव मारला. शाकाहारींसह मांसाहारी तसेच स्टार्टर्स खाण्यासाठी गर्दी होत होती.
चोख नियोजन केल्याबद्दल खासदार शेट्टर यांच्याकडून रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अभिनंदन शनिवारी रात्री बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर तसेच लोकमान्य को-ऑप. सोसायटीचे चेअरमन डॉ. किरण ठाकुर यांनी अन्नोत्सवाला उपस्थिती लावली. लाखो खाद्यप्रेमींची उपस्थिती असतानाही चोख नियोजन केल्याबद्दल खासदार जगदीश शेट्टर यांनी रोटरी क्लब ऑफ बेळगावचे अभिनंदन केले. बेळगावमध्ये अन्नोत्सवसारखे आणखीही उपक्रम राबवावेत, अशा शुभेच्छा डॉ. किरण ठाकुर यांनी दिल्या. रविवारी गायिका श्रेया यांच्या सुमधूर गीतांचा रसिकांनी मनमुराद आनंद लुटला. बॉलिवूडमधील सदाबहार गाणी त्यांनी सादर केली. रविवार असल्याने खाद्यप्रेमींनी मांसाहारी खाद्यपदार्थांवर ताव मारत संगीताचा आनंद घेतला. अलग रिदम बँडतर्फे संगीताचा उत्कृष्ट नमुना सादर केला.









