चिकन-मटण खरेदीसाठी सकाळपासून रांगा
बेळगाव : रंगोत्सवाचा आनंद लुटताना खवय्यांनी मांसाहारी पदार्थांवर ताव मारला. शुक्रवारी सकाळी 7 वाजल्यापासून चिकन-मटण दुकानांवर नागरिकांची गर्दी होती. दुकानांसमोर लांबच लांब रांगा दिसून आल्या. विशेषत: काकतीवेस परिसरात तर सर्व दुकानांवर प्रचंड गर्दी झाली होती. होळीच्या दुसऱ्या दिवशी मांसाहार करायचा हा प्रघात मागील काही वर्षांपासून पडला आहे. कोल्हापूरप्रमाणेच बेळगावमध्येही मटण खवय्यांची संख्या मोठी आहे. मटणाचा दर प्रति किलो 740 रुपये होऊनही खरेदी करण्यासाठी रांगा लावण्यात आल्या होत्या. मटणासोबतच चिकन खरेदीही मोठ्या प्रमाणात सुरू होती. महाराष्ट्रासह कर्नाटकात बर्ड फ्ल्यूचे सावट असल्याने चिकनचा दर काहीसा गडगडलेला दिसून आला. 160-170 रु. किलो दराने चिकनची विक्री करण्यात येत होती.
मोठ्या प्रमाणात उलाढाल
रंगोत्सवानिमित्त सकाळपासून मटण शौकिनांची प्रचंड गर्दी झाली होती. शहरात 200 मटण शॉप्स असल्याने शुक्रवारी रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. मटण सोबतच चिकन खरेदीसाठी खवय्यांचा उत्साह दिसून आला.
– उदय घोडके,(अध्यक्ष बेळगाव सिटी मटण शॉप ओनर्स असोसिएशन)









