प्रतिनिधी /बेळगाव
श्रावणमासाला शुक्रवारपासून प्रारंभ होत आहे. गुरुवारी दिव्यांची अमावास्या आहे. या निमित्ताने बाजारपेठेत बुधवारी खरेदी झाली. दिव्यांच्या अमावास्येचे गटारी अमावास्या असे विडंबन चुकीचे आहे. वास्तविक गटारी हा शब्द चुकीचा असून ती गताहारी अमावास्या म्हणून ओळखली जाते. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. आषाढी अमावास्येनंतर आहारात बदल केला जातो. या दिवसाला गताहारी (जो आहार गेला आहे ती) अमावास्या म्हणतात.
श्रावण सुरू होण्यापूर्वी व नंतरही कित्येकदा उपोषणाची स्थिती असते. पावसाळी पाण्याने रोगराई पसरू शकते. अशा वेळी आरोग्य राखण्याच्यादृष्टीने चार महिन्यांसाठी ठरावीक भोजन किंवा आहार ठरवून दिला गेला आहे. ज्याला आपण चातुर्मास असे म्हणतो. ओलसर पावसाळी वातावरणात मांसाहार नीट पचत नाही. शिवाय हा काळ प्राण्यांच्या विणीचा म्हणजेच प्रजननाचा काळ आहे. त्यावेळी त्यांची हत्या केली तर नवीन प्राणी जन्माला येणार नाहीत, म्हणून या काळात मांसाहार वर्ज्य करण्यात आला आहे.
बाहेरच्या दमट वातावरणामुळे प्राण्यांच्या शरीरावर आणि आतही घातक जीवजंतू असण्याची शक्मयता असल्याने त्यांचा नाश न झाल्यास मनुष्याला त्रास होण्याची शक्मयता आहे. म्हणूनच मांसाहार टाळून जंतू संसर्गाचा धोका कमी होण्याच्यादृष्टीने हे नियम दिले आहेत. याच कारणास्तव मांसाहार वर्ज्य असून गताहारीचे महत्त्व लक्षात घ्यायला हवे. गुरुवारी दीपपूजा आहे. त्यालाच दीप अमावास्या असे म्हटले जाते. गटारी अमावास्या म्हणून त्याचे विडंबन न करणे श्रेयस्कर होय.
मटण-चिकन दुकानांमध्ये गर्दी
दरम्यान, श्रावण आणि अमावास्या असल्याने मांसाहार वर्ज्य आहे. परिणामी बुधवारी मटण व चिकनच्या दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली. शहराबरोबरच ग्रामीण भागातही ही गर्दी दिसून आली. बाजारपेठेत अळंबीही दाखल झाली असून त्यांचीही खरेदी तेजीत झाली.









