नवीन वस्तू खरेदीला पसंती : विजयादशमीनिमित्त उत्साहाला उधाण
बेळगाव : खंडेनवमी आणि विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर रविवारी बाजारात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. पूजेच्या साहित्याबरोबर इलेक्ट्रॉनिक शोरुम, कपड्यांची दुकाने आणि मिठाई खरेदीला पसंती देण्यात आली. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसरोत्सवासाठी नवीन वस्तू खरेदीवर भर दिला जातो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिक आणि कपड्यांची खरेदी वाढली होती. दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी भक्तांच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यामुळे विविध साहित्यांची खरेदी वाढली आहे. नवीन वस्तूंच्या खरेदीबरोबर मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोने आणि नवीन वाहनांचे बुकिंग होत आहे. त्यामुळे ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक दुकाने आणि वाहनांच्या शोरुममध्ये गर्दी वाढत आहे.
खंडेनवमीच्या पूर्वसंध्येला बाजारात हार, फुले, अंबोत्या, केळीची पाने, नारळ, विडा, अगरबत्ती, लिंबू, कापूर, धूप आदी पूजेच्या साहित्याची खरेदी झाली. शहराच्या विविध भागात ऊस आणि झेंडूची आवक वाढली होती. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले दाखल झाली आहेत. शिवाय मागणीही वाढू लागली आहे. त्याबरोबरच शेवंती, गुलाब आणि इतर फुलांनाही पसंती दिली जात आहे. बाजारात विविध फळांना मागणी वाढू लागली आहे. सफरचंद, सीताफळ, पेरू, डाळिंब, संत्री, केळी आदी फळांची खरेदी होऊ लागली आहे. मात्र, फळांच्या किमती वाढल्या आहेत. 40 रुपये डझन असणारी केळी 60 ते 70 रुपये झाली आहेत. त्याबरोबरच पूजेसाठी नारळाची खरेदी होऊ लागली आहे. गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, काकतीवेस, शनिवार खूट, खडेबाजार आदी ठिकाणी नागरिकांची रेलचेल पाहावयास मिळाली. विशेषत: रंगीबेरंगी जातीच्या फुलांच्या छटा बाजारात पाहावयास मिळाल्या. शिवाय हार, फुलांची आणि पूजेच्या साहित्याची खरेदीही वाढली होती. रविवारी सुटीचा दिवस असल्याने कुटुंबासमवेत नागरिकांनी खरेदीला पसंती दिली.









