पणत्या, आकाशकंदील, उटणेची खरेदी जोरात
बेळगाव / प्रतिनिधी
दिवाळीच्या खरेदीसाठी शनिवारी बाजारपेठेत झुंबड उडाली होती. आकाशकंदील, पणत्या, सुगंधी उटणे, साबण, तेल, तयार फराळ, ड्रायप्रुटस, फुले, हार यांची खरेदी जोरात होती. सायंकाळपर्यंत पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात प्रचंड गर्दी होती. शनिवारी बँका तसेच सरकारी कार्यालयांना सुटी असल्यामुळे खरेदीसाठी नोकरदार बाहेर पडले होते.
शुक्रवारपासून दिवाळीला सुरुवात झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन असल्यामुळे रविवारी गर्दीत येण्यापेक्षा शनिवारीच खरेदी केलेली बरी या विचाराने अनेकजण बाजारात दाखल झाले होते. शनिवारी बेळगावचा आठवडी बाजार असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची संख्या सर्वाधिक होती. गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड या महत्त्वाच्या परिसरात दुकानांसोबतच रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लहान विपेते साहित्य विक्री करीत होते.
छोटय़ा कंदिलापासून मोठे आकाशकंदील, विविध आकारातील मातीच्या व चिनी मातीच्या पणत्या, रांगोळी, रांगोळीचे साचे, पूजेसाठी लागणारे साहित्य, फळे, फुले, बत्ताशे, खातेकीर्द वहय़ा, विद्युतमाळा यांची खरेदी केली जात होती. याचबरोबर आंब्याच्या डहाळय़ा, केळीची पाने, कारीट यांचीही मागणी होती.
नोकरदार महिलांचे प्रमाण वाढले असल्याने तयार फराळ खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. यामुळे अनेक बचतगट व गृहोद्योगांद्वारे महिलांनी फराळ तयार केला आहे. चकली, करंजी, अनारसे, शंकरपाळी, रवा-बेसनचे लाडू यांचे स्टॉल ठिकठिकाणी मांडण्यात आले आहेत. फराळाच्या खरेदीसाठी महिलावर्गाची झुंबड उडाली आहे.
शहरातील पार्किंग फुल्ल
बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱया मनपा तसेच खासगी पार्किंगमध्ये वाहनेच वाहने दिसत होती. बापट गल्ली येथील कार पार्किंगमध्ये तर सकाळी 10 वाजल्यापासूनच पार्किंग फुल्लचे बोर्ड लावण्यात आले होते. त्यामुळे मिळेल त्या ठिकाणी दुचाकी व चारचाकी वाहने पार्किंग केली जात होती. कोल्हापूर, गोवा, सिंधुदुर्ग, चंदगड व बेळगाव तालुक्मयातील वाहनांची संख्या असंख्य होती. धर्मवीर संभाजी चौकापासून कॅम्प येथील उभा मारुती मंदिरापर्यंत वाहनांची गर्दी दिसून आली. बेळगावसोबतच शहापूरमधील बँक ऑफ इंडिया कॉर्नर व गोवावेस येथील बीएससी मॉल परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होती.









